मांडवा ते जलालपूर रस्त्याचे काम संथ गतीने
परभणी: तालुक्यातील मांडवा ते जलालपूर या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मागील दोन वर्षापासून सुरू आहे. विशेष म्हणजे मुदत संपूनही या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. सद्यस्थितीत या रस्त्यावर मुरूम व खडी अंथरण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम संबंधित कंत्राटदाराने तात्काळ सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
११४ ट्रॅक्टरचे वाटप
परभणी: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप करण्यात येतात. २०१७ ते २०२० या तीन वर्षात जिल्ह्यातील ११४ लाभार्थ्यांना मिनी ट्रॅक्टर चे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये २०१७-१८मध्ये ५०, २०१८-१९ मध्ये २४ तर २०१९-२० मध्ये ४० लाभार्थ्यांचा समावेश आहे. ही योजना सामाजिक न्याय व विशेष विभागाकडून राबवली जाते.
तीन वर्षांत १७५ सामूहिक विवाह सोहळे
परभणी: अनुसूचित जातीच्या आर्थिक कुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याची योजना सामाजिक न्याय विभागाकडून राबवली जाते. त्यासाठी कन्यादान योजना हे नाव देण्यात आले आहे. २०१७ ते २०२० या तीन वर्षात जिल्ह्यामध्ये १७५ सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे शासनाच्या वतीने या सामूहिक सोहळ्यावर ४२ लाख रुपयांचा खर्चही केला आहे. यामध्ये २०१७-१८ मध्ये ५२, २०१८-१९ मध्ये ४० व २०१९-२० या आर्थिक वर्षात ८३ सामूहिक विवाह सोहळ्याचा समावेश आहे.
तक्रार अर्ज देऊनही शेतकरी मदतीपासून वंचित
परभणी:सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे तक्रार अर्ज जिल्ह्यातील १ लाख १० हजार ५३६ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे दाखल केले होते. मात्र तक्रार अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांनाही विमा कंपनी व जिल्हा कृषी विभागाने मदतीपासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.