कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी राज्य शासनाने लसीकरणावर भर दिला आहे. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ६ लाख ४८ हजार नागरिकांना ही लस द्यावयाची असून, त्यासाठी ७ लाख डोसेसची आवश्यकता आहे. राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने लस पुरविण्याचा निर्णय घेतला असून, डोस वेळेत उपलब्ध झाले नाही तर ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण उपक्रमात खोडा निर्माण होऊ शकतो. सध्या जिल्ह्यामध्ये १७ हजार ६९० डोसेस उपलब्ध आहेत. त्यातून ज्येष्ठ नागरिक आणि आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. त्यामध्ये उपकेंद्र स्तरावरूनही लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
४५ वर्षांपुढील ६ लाख नागरिकांना करावे लागणार लसीकरण
परभणी जिल्ह्यात ४५ वर्षांपुढील ६ लाख ४८ हजार नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने दिले आहे. सध्या ४८ केंद्रांवरून लसीकरण केले जात आहे. टप्प्याटप्प्याने उपकेंद्र स्तरावरही लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
सात लाख डोसेसची आवश्यकता
४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाचे लसीकरण करण्यासाठी आता आरोग्य विभागाला आणखी ७ लाख डोसेसची आवश्यकता भासणार आहे. सध्या जिल्ह्यात कोविशील्डचे १७ हजार ६९० डोसेस उपलब्ध आहेत. लवकर उर्वरित डोसेस उपलब्ध होतील, अशी आशा आहे.