जिल्ह्यात सध्या म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना या आजाराची लक्षणे आढळत आहेत. येथील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयातही काही रुग्णांना ही लक्षणे आढळली. त्यामुळे हा संसर्ग इतर रुग्णांपर्यंत पोहोचू नये तसेच इतर रुग्णांनाही ऑक्सिजन पुरवठा करताना काळजी घेतली जात आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी असलेले फ्लोमीटर्स आणि इतर साधनांच्या निर्जंतुकीकरण केले जात आहे. विशेष म्हणजे, नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ.दुर्गादास पांडे यांनी दिले आहेत.
म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा धोका सध्या निर्माण झालेला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची प्रतिकारक्षमता कमी झाल्याने या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लक्षणे जाणवू शकतात. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय साधनांच्या निर्जंतुकीकरणावर भर देण्यात आला आहे. दररोज ऑक्सिजन दिल्या जाणाऱ्या रुग्णांना वापरण्यात येणाऱ्या फ्लोमीटरचे नियमितपणे निर्जंतुकीकरण केले जात आहे.