परभणी : जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीत आणि राज्यस्तरावरील पोर्टलमधील कोरोनाबाधित मयत रुग्णांच्या आकडेवारीत फरक निर्माण झाला आहे. राज्याच्या पोर्टलवर रुग्णांच्या मृत्यूची संख्या अधिक आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेताना प्रशासनातच गफलत होत असल्याची बाब समोर आली आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाने शहरी आणि ग्रामीण असे दोन विभाग केले असून, त्यानुसार त्या त्या भागातील कोरोनाबाधित मयत रुग्णांची नोंद घेतली जाते. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या वतीने दररोज जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीत आणि राज्यस्तरावर प्रकाशित होणाऱ्या पोर्टलवरील मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नोंदीत तफावत येत आहे.
१८ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने एकूण १ हजार १५३ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद घेतली आहे, तर याच दिवशी राज्यस्तरावरून प्रकाशित झालेल्या प्रेसमध्ये जिल्ह्यात ८१२ आणि मनपाअंतर्गत ४५९, अशा १ हजार २७१ रुग्णांचा जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या ११८ रुग्णांची नोंद जिल्हास्तरावर घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे.
वार रूममधून केवळ नियंत्रण
कोरोनाबाधित रुग्णांच्या नोंदी घेण्यासाठी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका स्तरावर वार रूम तयार करण्यात आली आहे. या वाररूममधून मृत्यूच्या नोंदी घेतल्या जातात. त्याचप्रमाणे हीच आकडेवारी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम वार रूममधून होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमधून ही माहिती घेतली जाते. कधी माहिती मिळण्यास उशीर होतो. त्यामुळे आकडेवारीत फरक येत आहे.
त्याचप्रमाणे जिल्ह्यात मयत रुग्णांची आकडेवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत जाहीर केली जाते. त्यानंतर होणाऱ्या मृत्यूची नोंद दुसऱ्या दिवशी घेतली जाते. त्यामुळे दोन्ही बाबींचा फरक येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहरी भागात सर्वाधिक मृत्यू
शहरी भागात महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मनपा हद्दीत ४५९ बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद राज्यस्तरावरील पोर्टलवर घेण्यात आली आहे.