सेलू (जि. परभणी): तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील माणिक कारभारी खोसे (वय २५, रा. ब्राह्मणगाव, ता. सेलू) या युवकाने प्रेमसंबंधात आलेल्या नैराश्यातून रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उशिरा रात्री पुढे आली.
माणिक खोसे याचे एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. संबंधित महिला पतीच्या छळाला कंटाळून माहेरी राहू लागली होती. या काळात त्या महिलेशी माणिकचे प्रेमसंबंध अधिक दृढ झाले आणि ते विवाहापर्यंत पोहोचले. मात्र, या नातेसंबंधाला नातेवाइकांकडून तीव्र विरोध होऊ लागला. या विरोधामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या माणिक खोसे यांनी रविवारी रात्री सुमारे १०:३० वाजेच्या सुमारास रवळगाव शिवारात धावत्या रेल्वे रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, पोलिस हवालदार मधुकर जाधव, पोलिस कॉन्स्टेबल जिवणे यांनी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
मृत्युपूर्वी स्टेटस ठेवून नातेवाइकांना पाठविला संदेशदरम्यान, माणिक खोसे याने स्वत:च्या मोबाइलवरील व्हॉट्सॲपवरील स्टेटसवर भावनिक संदेश ठेवला. तसेच तो इतर नातेवाइकांनाही पाठविला. घटना घडल्यानंतर नातेवाइकांना मोठा धक्का बसला.