तूर खरेदीच्या मागणीसाठी परभणीतील शेतकरी आक्रमक
By Admin | Published: April 26, 2017 01:44 PM2017-04-26T13:44:00+5:302017-04-26T13:44:00+5:30
तूर खरेदी करण्याच्या मागणीसाठी परभरणीतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करुनही आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केला.
ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 26 - तूर खरेदी करण्याच्या मागणीसाठी परभरणीतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. 22 एप्रिलपर्यंत रांगेत असलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी परभणीत तसे आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी वसमत रस्त्यावर पाऊण तास रास्तारोको आंदोलन केले.
जिल्ह्यातील 5 हमीभाव तूर खरेदी केंद्र २२ एप्रिल रोजी बंद झाले आहेत. केंद्र बंद असले तरी खरेदीला मुदतवाढ मिळेल, या आशेने परभणीत तूर घेऊन आलेले शेकडो वाहने रांगेत उभी आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे, अशाची तूर खरेदी करण्याची घोषणा मंगळवारी केली आहे. मात्र परभणी येथे अद्याप तसे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याने बुधवारी सकाळी परभणीत तूर खरेदी बंदच होती. शासनाचे जसे आदेश प्राप्त होतील त्याप्रमाणे खरेदी सुरू केली जाईल, असे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
संतप्त शेतकरी रस्त्यावर
दरम्यान, बुधवारी सकाळी तूर खरेदी सुरु झाली नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी माकपचे विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली परभणी- वसमत रस्त्यावर खरेदी केंद्राजवळच पाऊण तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गेल्या एक महिन्यापासून शेतकरी तूर विकण्यासाठी नफेडच्या खरेदी केंद्रावर रांगेत आहेत. तेव्हा सर्व तुरीची खरेदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांचा मालाला आधारभूत भाव देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे तूर खरेदी करुन सरकार उपकार करत नाही. जे व्यापारी हमी भावापेक्षा कमी दराने तूर खरेदी करतील, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई शासनाने केली पाहिजे. रांगेत असलेल्या आणि घरी साठवून ठेवलेल्या सर्व तुरीची खरेदी करून शेतकऱ्यांना तत्काळ चुकारे द्यावेत, अशी मागणी विलास बाबर यांनी केली.
परभणीत ९५ वाहनांची नोंदणी
परभणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर २२ एप्रिलपर्यंत ९५ वाहनांची नोंदणी झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाणार आहे.
आदेश येताच होणार केंद्र सुरू
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २२ एप्रिलपर्यंत १ लाख १८ हजार ६६६ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. रांगेत असलेल्या वाहनांची नोंदणी झाली असून, शासनाचे आदेश प्राप्त होताच खरेदी केंद्र सुरू केले जाईल. - के जे शेवाळे, सहायक मार्केटिंग अधिकारी