मानवत (जि. परभणी) : येथील एका जणाला दिल्ली पोलिसांनी ४ कोटी ९६ लाख रुपयांच्या फसवणुकीतील गुन्ह्याचा आरोपी म्हणून शुक्रवारी मानवतमधून अटक केली. दिल्ली पोलिसांनी सदर आरोपीस मानवत येथील न्यायालयात प्रस्तुत करून पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्ली येथे सायबर क्राइम सेलच्या स्पेशल युनिटकडे २७ नोव्हेंबर २०२४ रोजी राजस्थान अँटिबयोटिक्स लिमिटेड या कंपनीकडून ४ कोटी ९६ लाख रुपयांची फसवणूक झाली, म्हणून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. यामध्ये अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडे असलेल्या मोबाइल नंबरवरून संदेश पाठवत राजस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड या कंपनीचा एमडी असल्याचे भासवून वेगवेगळ्या क्रमांकांवर दोन आरटीजीएस करवून घेतले होते. त्यामध्ये एका अकाउंटवर १ कोटी ९६ लाख, तर दुसऱ्या अकाउंटवर ३ कोटी, असे एकूण ४ कोटी ९६ लाख रुपयांचे आरटीजीएस स्वतःच्या नावावर करवून घेतले होते.
याप्रकरणी कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी संजय मित्तल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या व्हाॅट्सॲप क्रमांक ९९३९१८८८२३ याच्यावर स्वतः कंपनीचे एमडी असल्याचे भासवून ४ कोटी ९६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासाअंती मानवत येथील रामनिवास दगडिया यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने दिल्ली पोलिसांच्या पथकाने मानवत पोलिस ठाण्याच्या मदतीने रामनिवास दागडिया यांना अटक केली.