परभणी : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग घटलेला असून शनिवारी चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता निर्माण झाली आहे.
मागील तीन-चार आठवड्यांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला ; परंतु उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र अद्यापही कमी झाले नाही. शनिवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात एक, आयटीआय हॉस्पिटलमधून २ आणि खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये २ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. बाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र अद्यापही थांबलेले नसल्याने चिंतेचे वातावरण आहे.
नवीन रुग्णांचे प्रमाण मात्र लक्षणीयरीत्या घटले आहे. आरोग्य विभागाला ५८६ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या ३५२ अहवालांमध्ये २२ आणि रॅपिड टेस्टच्या २३४ अहवालांमध्ये १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५० हजार १५१ झाली असून, त्यापैकी ४७ हजार ५९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २४७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १ हजार ३०८ रुग्ण उपचार घेत आहेत.
४६२ रुग्णांची कोरोनावर मात
शनिवारी दिवसभरात ४६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली.