परभणी : भरधाव वेगात आलेल्या एका कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना या कारने धडक दिली. यामध्ये दहा ते बारा दुचाकींचे नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या एका रुग्णालयासमोर घडली. शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या बसस्थानक परिसरात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास बसस्थानकाकडून रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या एका कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामध्ये अण्णाभाऊ साठे पुतळ्याशेजारी असलेल्या एका रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या १० ते १२ दुचाकी वाहनांना या कारची जोरात धडक बसली. यामध्ये अनेक वाहने दुसऱ्या वाहनावर आडव्या पडल्या. यानंतर कारचालकाने तेथून काढता पाय घेतला. यात एक जण गंभीर जखमी झाल्याचे समजले. यासह ज्या दुचाकीचे नुकसान झाले, असे अनेक वाहनधारक घटनास्थळी कार चालकाचा शोध घेत होते. वाहनधारक आणि बघ्यांची परिसरात गर्दी झाली होती. घटनेनंतर जवळपास अर्धा तास पोलीस घटनास्थळी आले नव्हते. सायंकाळपर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता.
कारच्या धडकेत अनेक दुचाकींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST