७ व ८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला तसेच छोट्या मोठ्या ओढ्यांना पूर आल्याने नदी काठी असलेल्या धारासुर, मैराळसावंगी, गौंडगाव, चिंचटाकळी, खळी, महातपुरी, मुळी, दुस्सलगाव आदी गावातील शेतात गोदावरी नदीच्या पुराचे तसेच पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले. परिणामी, शेकडो हेक्टर शेत जमिनीत उभ्या असलेल्या कापूस, सोयाबीन, तूर, ऊस आदी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. याचप्रमाणे गोदावरी नदीला आलेल्या पुराचे बॅक वॉटर इंद्रायणी नदीसह ओढ्यात शिरल्याने इंद्रायणी नदी काठच्या सुनेगाव, सायळा, रुमणा, जवळा शिवारातील पिके पाण्याखाली गेली. तर खळी गावालगत असलेल्या सोंडच्या ओढ्यात ही गोदावरी नदीचे बॅक वॉटर आल्याने खळी गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभे हिरवेगार पिके पिवळे पडत असल्याने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
अतिवृष्टीने शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST