गंगाखेड : यावर्षी झालेल्या पावसामुळे पैठण व माजलगावचे धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, या दोन्ही धरणांतील पाणी रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सोडण्याचे अद्यापपर्यंत नियोजन झालेले नाही. त्यामुळे तालुक्यातील १८ हजार हेक्टरवरील पिके पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे गोदावरी नदी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. तालुक्यातील मैराळ सावंगी, गोंडगाव, चिंचटाकळी, ब्राह्मणवाडी, खळी तांडा, खळी, महातपुरी, दुसलगाव, अंबरवाडी, मुळी, धारखेड, नागठाणा आदी शिवारातील १८ हजार हेक्टर शेत जमिनीतील रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडणे गरजेचे आहे. मात्र, यावर्षी पैठण आणि माजलगावचे धरण शंभर टक्के भरले आहे. या पाण्याचा फायदा अद्यापही गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेला नाही. विशेष म्हणजे माजलगाव व पैठण धरणातील पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्याबाबत कुठलेही नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे सद्यस्थितीत गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीला लाभक्षेत्रातील १८ हजार हेक्टर शेतजमिनीवरील पिकांसाठी पाण्याची गरज आहे. मात्र, हे पाणी अद्याप सोडण्याबाबत कोणतेही नियोजन न झाल्याने उन्हाळी हंगामातील भुईमूग, मका, भाजीपाला तसेच रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू आदी पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माजलगाव व पैठण धरण प्रशासनाने तातडीने पावले उचलत गोदावरी नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.