मागील खरीप हंगामात अवकाळी पाऊस व रब्बी हंगामात वादळी वारे व पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती दोन्ही हंगामातील पिकांमधून उत्पन्न हाती लागले नाही. त्याचबरोबर मागील वर्षीपासून कोरोना संसर्गामुळे शेती संलग्न असणारे व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे शेतकरी सद्यस्थितीत आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यातच खरीप हंगामाची पेरणी तोंडावर येऊन ठेपली आहे. या खरीप हंगामातील पेरणीसाठी आवश्यक असणाऱ्या बी-बियाणे, खते व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागात उसनवारी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पीक कर्जाकडे लागल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी १,६२० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत जवळपास ४ हजार शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयांचे वाटप बँकांनी केले आहे. त्यामुळे यावर्षी सर्व बाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेत व पेरणीपूर्वी बँकांनी पीक कर्ज वाटप करून वेळेत पैसा उपलब्ध करून दिला तर शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी सोयीचे होणार आहे.
दोन ते तीन वर्षापासून उद्दिष्ट होईना पूर्ण
जिल्हा प्रशासनाने बँकांना खरीप हंगामात दिलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट मागील दोन ते तीन वर्षांपासून बँकांकडून पूर्ण करण्यात येत नाही. कधी ६० टक्के तर कधी ५० टक्क्यांवर पीक कर्ज वाटप थांबले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारासह उसनवारी करून आपली पेरणी पूर्ण करावी लागली. त्यामुळे चाेहोबाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना किमान यावर्षी तरी बँकांकडून वाटप करण्यात येणाऱ्या पीक कर्जाचा सहारा मिळेल, अशी अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त होत आहे.