परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन ठिकाणी लागलेल्या आगप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या वरच्या मजल्यावर शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आणि याच परिसरातील धोबीघाट येथे रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याच्या घटना घडल्या. या घटनांमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणात जीवितहानी झाली नसली तरी घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी दीपक मोहोळकर यांनी चौकशी समिती नेमली आहे. त्याचप्रमाणे रविवारी रात्री उशिरा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक प्रकाश डाके यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात याविषयीची तक्रार दिली. त्यानुसार नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. टी. बाचेवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आग लावल्याचा संशय
धोबीघाट भागात लागलेल्या आगीत साधारणतः २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. धोबी घाटाच्या पाठीमागील बाजूस कचरा जमा करून त्यास आग लावण्यात आली. त्यानंतरही आगीचे निखारे खिडकीतून टाकले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.