परभणी महानगरपालिकेतील कामगार, कर्मचाऱ्यांनी २२ फेब्रुवारीपासून विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी तयार करावी, सेवापुस्तिका अद्ययावत कराव्यात, सन २००० च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याचे आदेश द्यावेत, कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नती द्यावी, मनपा प्रशासनात ज्येष्ठ व शैक्षणिक अर्हताप्राप्त कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, यासह विविध मागण्यांसाठी उपोषण निवेदने, धरणे आंदोलने करण्यात आली. मात्र, शासनाने दखल न घेतल्याने २६ मार्च रोजी मनपा कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवत कामकाज सुरू ठेवले. या आंदोलनात आयटक व अन्य कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. निषेध आंदोलनानंतर मनपा आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनावर कॉ. माधुरी क्षीरसागर, कॉ. जालिंदर कांबळे, आवेश हाश्मी, कॉ. भगवान कनकुटे, शेख रिझवान, अब्दुल सत्तार आदी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.