परभणी शहर व जिल्ह्यात मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. यानंतर आतापर्यंत दररोज बाधितांची संख्या, मृत्यूचे प्रमाण वाढतच राहिले. शहरातील शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अनेकांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मयताच्या पार्थिवावर अंत्यसंसकार करण्याची जबाबदारी परभणी महापालिकेच्या पथकावर देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १२८८ जणांचे मृत्यू झाले असल्याची नोंद आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याची नोंद मनपाच्या पथकाकडे आहे. यानुसार प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी ५ हजार रुपयांप्रमाणे ८ जूनपर्यंत ६४ लाख ४० हजार एवढा खर्च महापालिकेच्या निधीतून झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित - ५०२४९
बरे झालेले - ४७८४८
सध्या उपचार घेत असलेले - ११६२
एकूण मृत्यू - १२८८
शासकीय रुग्णालयातील मृत्यू - ९३४
खासगी रुग्णालयातील मृत्यू - ३५४
एका अंत्यसंस्काराचा खर्च पाच हजार
दररोज होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेने पथकाला प्रति अंत्यसंस्कार करण्यासाठी ५ हजार रुपये एवढा निधी मंजूर केला आहे. यानुसार लाकडे, डिझेल, राळ, मीठ, तूप, हार व अन्य साहित्य, असे मिळून ३ हजार, तर पीपीई किटचा कर्मचाऱ्यावर होणारा खर्च २ हजार एवढा आहे. शहरातील जिल्हा रुग्णालय असो की खासगी रुग्णालय येथील कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी पथक रुग्णालयापासून शव घेऊन त्याचे अंत्यसंस्कार करण्यापर्यंत सर्व सोपस्कार पूर्ण करते.
स्वच्छता विभागातील १२ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी
महापालिकेच्या अंत्यसंस्कार पथकात १२ जणांचा समावेश आहे. यामध्ये २ वाहन चालक, पथकप्रमुख करण गायकवाड, मुकादम किरण गायकवाड, शेख सलीम, गौतम उबाळे, सुरेश धुतडे, भामराव उबाळे, अशोक उबाळे, राहुल भराडे, संतोष टेकाळे, कृष्णा जगताप यांचा समावेश आहे. यामध्ये एक वाहन जिल्हा रुग्णालयाचे, तर अन्य एक वाहन मागील दोन महिन्यांपासून महापालिकेने कार्यान्वित केले आहे.
शासकीय रुग्णालयात ९३४ मृत्यू
आतापर्यंत कोरोनाने एकूण झालेल्या मृत्यूपैकी ९३४ मृत्यू हे जिल्हा रुग्णालय, आयटीआय कोविड रुग्णालय, जिल्हा परिषद कोविड रुग्णालय येथे झाले आहेत, तर अन्य ३५४ मृत्यू शहरातील खासगी रुग्णालयात झाल्याची नोंद महापालिकेच्या अंत्यसंस्कार पथकाकडे झाली आहे. प्रति अंत्यसंस्कार ५ हजार याप्रमाणे १२८८ मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ६४ लाख ४० हजार एवढा खर्च महापालिकेने केला आहे.
३७ जणांच्या अंत्यसंस्काराला कोणीच आले नाही
कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांसह कुटुंबातील किमान ३-४ सदस्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत पथक येण्यास परवानगी देते. त्यांना पीपीई किट घालून तेथे विधिवत पूजा करण्यास परवानगी आहे. यानंतर उर्वरित कामे मनपा पथक पार पाडते. यातही आजपर्यंत केलेल्या अंत्यसंकाराच्या वेळी ३७ जणांचे पूर्ण अंत्यसंस्कार या पथकालाच करावे लागले. स्मशानभूमीत या मयत झालेल्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य हजर झाला नव्हता.