परभणी : कोरोनाच्या संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी संचारबंदी लावून विनाकारण घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला असला तरी घरातच बसून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच या कोरोनाचा सर्वाधिक धोका झाल्याची बाब आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही लाटेत मिळून ६१ ते ७० वर्षे वयोगटातील ४ हजार ७१० नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यातील ३३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच वयोगटात जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून जिल्हावासीय त्रस्त आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संसर्ग कमी झाला असला तरी मागे वळून पाहिले तर ज्येष्ठ नागरिकांनाच कोरोना सर्वाधिक धोकादायक ठरल्याचे दिसते.
शासकीय आणि इतर सेवांमधून सर्वसाधारणपणे ६० वर्षांनंतर सेवानिवृत्ती होते. त्यानंतरचा काळ हा निवृत्तीचा काळ असतो. जबाबदाऱ्या कमी झाल्याने शक्यताे या वयोगटातील नागरिक घराबाहेर पडत नाहीत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आदेश दिले. मात्र, जे नागरिक घराबाहेर पडले, त्यांच्यापेक्षाही अधिक घराबाहेर न पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा संसर्ग धोकादायक ठरला आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ६१ ते ७० या वयोटात सर्वाधिक ३३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इतर वयोगटाच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. त्या खालोखाल ५१ ते ६० या वयोेगटातील ७ हजार २२४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील २९७ रुग्णांचा मृत्यू झाला. ७१ ते८० या वयोगटात १ हजार ७९३ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील १७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ ते ५० या वयोगटातील ८ हजार ८८१ नागरिकांना कोरोना संसर्ग झाला असून, त्यातील १४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या मृत्यूची संख्या पाहता ६१ ते ७० वयोगटासाठी दोन्ही कोरोना लाटा धोकादायक ठरल्याचे दिसते.
शंभरीपुढील नागरिकांनी मात्र घडविला आदर्श
ज्येष्ठ नागरिकांसाठी ही कोरोनाची लाट धोकादायक ठरली असली तरी १०० वर्षांपुढील नागरिकांनी मात्र आपली प्रतिकारक्षमता या काळातही सिद्ध करून दाखविली आहे. १०१ ते १३० या वयोगटातील ५२ नागरिकांना कोरोना झाला होता. त्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण पाहता, ३.८५ टक्के एवढे आहे. तर ६१ ते ७० वयोगटातील मृत्यूचे प्रमाण ७.०१ टक्के आहे. ९१ ते १०० या वयोगटात मात्र मृत्यूचे प्रमाण ११.६३ एवढे सर्वाधिक आहे.
३१ ते ४० वयोगटातील सर्वाधिक बाधित
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येमध्ये ३१ ते ४० या वयोगटात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार ३२५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ३१ ते ४० या वयोगटात सर्वाधिक १० हजार ८६० नागरिकांना कोरोनाची लागण झाली. तर ० ते १० वर्षे या बालकांच्या वयोगटात सर्वात कमी १ हजार ४२४ रुग्ण नोंद झाले आहेत.