जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर वाढला असून, नागरिकांना दिलासा मिळत आहे; मात्र कोरोनातून मुक्त झाल्यानंतरही अनेक रुग्णांना विविध आजार जडत असल्याचे समोर येत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयरोग, पॅरालिसिस, न्यूमोथोरॅक्स, रक्तदाब, मधुमेह, मेंदूज्वर, लंग फायब्रोसिस यासारख्या आजाराच्या रुग्णांचे निदान झाले आहे. कोरोना काळात प्रतिकारक्षमता कमी झाल्याने इन्फेक्शन वाढून इतर आजार जडण्याची शक्यता असते. अशी लक्षणे असलेले रुग्ण जिल्ह्यामध्ये समोर येत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीनंतरही नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
रेडमेसिविर, स्टेरॉइडच्या साइड इफेक्टचे रुग्ण नाहीत
येथील शासकीय रुग्णालयात रेमडेसिविर आणि स्टेरॉईडमुळे साइड इफेक्ट झालेल्या रुग्णांची नोंद नसल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली. रुग्णांना योग्य प्रमाणामध्ये रेमडेसिविर आणि स्टेरॉईड दिले जातात. त्यामुळे या दोन्ही बाबींमुळे साइड इफेक्ट झाल्याचे रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
स्टेराॅईडचा अतिवापर असतो घातक
स्टेरॉईडचा अतिवापर रुग्णाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, आवश्यकतेनुसार आणि ज्या रुग्णांना आवश्यकता आहे, अशाच रुग्णांना स्टेरॉईड दिले जातात. त्यामुळे स्टेरॉईडचे साईड इफेक्ट झालेल्या रुग्णांची संख्या नगण्य असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
कोरोनानंतर रुग्णांमध्ये काही आजार जाणवत आहेत. तेव्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांनी दररोज श्वसनाचा व्यायाम करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याची नियमितपणे तपासणी करणेही आवश्यक आहे. डोळ्याखाली, चेहऱ्यावर सूज येत असेल, डोळे दुखत असतील तरीही तत्काळ वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करावा.
डॉ. रुपेश नगराळे
कोरोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. घराबाहेर पडताना त्याचप्रमाणे घरी असताना देखील कटाक्षाने मास्क वापरला पाहिजे, आपल्यामुळे घरातील वडीलधाऱ्या मंडळींना कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतर देखील स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. डॉ.गोविंद रसाळ