कोरोनाच्या संकटाबरोबरच इतर अनेक संकटे जिल्ह्यातील नागरिकांना झेलावी लागत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून, आता कोरोना प्रतिबंधक लसही संपली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लस घेऊन सुरक्षित व्हावे, अशा उद्देशाने अनेक नागरिक लसीची मागणी करीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यात या लसीचा अत्यल्प साठा शिल्लक आहे.
शनिवारी जिल्ह्याला कोव्हॅक्सिन या लसीचे ६ हजार डोसेस प्राप्त झाले होते. रविवारी आरोग्य केंद्रनिहाय १०० डोस याप्रमाणे या लसीचे वितरण करण्यात आले. रविवारी शक्यतो लसीकरण केंद्र बंद ठेवले जाते. त्यामुळे बहुतांश केंद्रांवर रविवारी लसीकरण झाले नाही. काही बोटावर मोजण्याइतक्याच केंद्रांवर ही लस उपलब्ध होती. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांमध्येही लस उपलब्ध असल्याची माहिती मिळाली; परंतु प्रत्यक्षात लसीचा साठा संपल्याने लसीकरण मोहिमेवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनाने लसीची वाढीव मागणी नोंदविली असून, ही लस मिळाल्यानंतरच लसीकरण सत्र सुरू होणार आहेत.