मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाची साथ पसरली आहे. शहरातही या तापाचे अनेक रुग्ण आढळत आहेत. डेंग्यूसदृश तापाची साथ पसरल्याने महानगरपालिकेच्या वतीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. डेंग्यूसदृश म्हणून नोंद झालेल्या रुग्णांची माहिती महापालिका प्रशासनाला कळविल्यानंतर या रुग्णांच्या घरात कंटेनर सर्व्हे केला जात आहे. हे सर्वेक्षण करून घरातील पाण्यामध्ये अबेट औषध टाकण्यात आले. तसेच डेंग्यूसदृश रुग्णाच्या घराच्या परिसरातील ५० घरांमध्ये धूरफवारणी करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेने दिली. त्याचप्रमाणे ६ ऑगस्टपासून प्रभागनिहाय धूरफवारणी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे धूरफवारणी करण्याची मागणी झाल्यास त्यानुसारही त्या भागात जाऊन फवारणी केली जात आहे.
३१ नमुन्यांमध्ये एकजण पॉझिटिव्ह
शहरात डेंग्यूसदृश असलेल्या ३१ रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. महापालिकेने हे नमुने जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले. एलायझा तपासणी केल्यानंतर त्यात एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.