४० वर्षांची परंपरा असलेल्या या सप्ताहास ३१ जानेवारी रोजी प्रारंभ झाला.झाली होती. ७ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. ज्ञानोबा माऊली मुडेकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप झाला. पारायणप्रमुख म्हणून ह.भ.प. ज्ञानोबा महाराज शेळगावकर यांनी जबाबदारी सांभाळली. ह.भ.प. सूर्यभान महाराज आवलगावकर यांनी भागवत कथा निरुपन केले.
सप्ताह दरम्यान दशरथ महाराज अंभोरे (चारठाणा), भरत महाराज जोगी (परळी वैजनाथ), एकनाथ महाराज हारसदकर (लोहा), धनंजय महाराज मोरे (नाशिक), काशिनाथ महाराज माने (फुलकळस), एकनाथ महाराज माने (वांगी), विश्वांभर महाराज कोल्हे (आळंदी) या कीर्तनकारांची कीर्तने झाली. ५१ जणांनी ज्ञानेश्वरी पारायण केले.
दररोजच्या कीर्तनात उध्दवबुवा पांचाळ, अशोकबुवा धोंडगे यांनी गायनाची तर तुकारामबुवा पांचाळ, केशवबुवा पांचाळ, कालिदास धोंडगे, पुरूषोत्तम पांचाळ, वैभव महाराज, मकरध्वज धोंडगे, पवन धोंडगे यांनी मृदंगाची साथ दिली. बंडू धोंडगे यांनी चोपदाराची भूमिका पार पाडली.
शेवटच्या दिवशी सकाळी सुर्यभान महाराज यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात गावातून दिंडी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत उद्धव महाराज व बालिकाताई यांनी उत्कृष्ट गौळणी, अभंग सादर करून उपस्थित भाविकांची मने जिंकत दिंडीमध्ये चांगलाच रंग भरला. अनेक भाविकांनी भजन व नृत्य करीत आणि फुगड्या खेळत दिंडीत आनंद लुटला. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. संपूर्ण सप्ताहात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी सर्व गावकर्यांनी खूप परीश्रम घेतले.