सेलू : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी आपल्या कार्यकर्त्याची वर्णी लावून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केली असून या पक्षातच दोन गट पडल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात अनियमितता आढळून आल्यानंतर भाजपाचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या ताब्यातील बाजार समितीचे संचालक मंडळ जानेवारीमध्ये प्रशासनाने बरखास्त केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आ. विजय भांबळे यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेला बाजूला सारून काँग्रेसला सोबत घेत ८ जणांचे अशासकीय प्रशासक मंडळ स्थापन करून बाजार समिती ताब्यात घेतली होती. मुख्य प्रशासक पदी विनायक पावडे यांची, तर उपमुख्य प्रशासकपदी माऊली ताठे या आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या ताब्यात बाजार समिती दिली. या प्रशासक मंडळात शिवसेनेच्या एकाही कार्यकर्त्याला स्थान दिले नसल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. जिंतूर बाजार समिती हातातून गेल्यामुळे दुखावलेले शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांनी सेलू बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी जिंतूरच्या वेळी अन्याय झाल्याचे कथन करून सेलूत न्याय देण्याची मागणी केली. परिणामी, ११ मे रोजी सहकार विभागाच्या उपसचिवांनी एक पत्र काढून राष्ट्रवादीचे अशासकीय प्रशासक मंडळ बदलून शिवसेनेचे पंचायत समितीमधील गटनेते रणजित गजमल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याचे आदेश काढले. हे पत्र काढून १५ दिवसांचा कालावधी झाला तरी ते जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाले नव्हते. दरम्यानच्या काळात माजी आ. भांबळे यांनी त्यांचेच प्रशासक मंडळ कायम राहावे, यासाठी पाठपुरावा केला; परंतु २८ मे रोजी जिल्हा उपनिबंधकांना ११ मे चे पत्र प्राप्त झाल्यानंतर तातडीने नूतन प्रशासकांनी पदभार घेतला. त्यामुळे भांबळेचे बाजार समितीतील वर्चस्व संपुष्टात आले. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात महाविकास आघाडीतील या दोन घटक पक्षांमधील राजकारण चांगलेच तापणार असल्याची चर्चा आहे.
दुर्राणी यांची उपस्थिती चर्चेचा विषय
शिवसेनेचे खा. बंडू जाधव व राष्ट्रवादी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्यात कधी काळी टोकाचे मतभेद होते; परंतु २८ मे रोजी शिवसेनेेच्या नेतृत्वाखाली प्रशासक मंडळाने बाजार समितीचा पदभार घेतल्यानंतर खा. जाधव यांच्या उपस्थितीत आ. दुर्राणी यांनी या प्रशासकांचा सत्कार केला. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये आ. दुर्राणी व माजी आ. भांबळे यांचे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. शिवाय आ. दुर्राणी व खा. जाधव यांनी आपसातील राजकीय वैर विसरून मैत्री केली की काय? अशीही चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भांबळे यांनी आ. सुरेश वरपूडकर यांना मदत केल्याने आ. दुर्राणी दुखावले. त्यामुळेच त्यांनी भांबळे यांच्या विरोधात उघड भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.