रब्बी हंगामातील संपूर्ण पिकांची काढणी झाली आहे. काही भागांमध्ये ज्वारीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काढून करून ठेवलेली ज्वारी शेतकऱ्यांनी शेतातच रचून ठेवली आहे. याच दरम्यान येत्या चार दिवसांत मराठवाड्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही पिके सुरक्षित ठिकाणी हलविण्याची आवश्यकता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम सेवेने पुढील चार दिवसांचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार १० एप्रिल रोजी जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांत तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ११ एप्रिल रोजी संपूर्ण मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर १२ एप्रिल रोजी जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात आणि १३ व १४ एप्रिल रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग अधिक राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.