परभणी शहरातील आयटीआय जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत डीसीएचसी हे कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार केले जातात. त्याचबरोबर अक्षदा मंगल कार्यालय आणि रेणुका मंगल कार्यालयात केअर सेंटर सुरू केले असून, या ठिकाणी कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार होतात. शहरातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने सेलू आणि गंगाखेड या दोन ठिकाणी केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्या ठिकाणीही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णालयात रुग्णांनी बेड अडविल्याची स्थिती नाही. केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांना कुठे उपचारासाठी पाठवायचे याची केंद्रीय पद्धत जिल्ह्यात अवलंबिली आहे. त्यानुसार रुग्णांना केअर सेंटर किंवा त्याच्या गरजेनुसार कोरोना रुग्णालयात उपचारासाठी पाठविले जाते.
येथील अक्षदा मंगल कार्यालयातील कोरोना केअर सेंटर्समध्ये १८४ पैकी १५४ तर रेणुका मंगल कार्यालयाच्या कोरोना केअर सेंटरमध्ये २०० पैकी १७८ रुग्ण उपचार घेत आहेत.
सेलूत फुल्ल, गंगाखेडमध्ये बेड रिक्त
सेलू येथे २ कोरोना केअर सेंटर असून या केंद्रांची क्षमता संपली आहे. गंगाखेड येथील कोरोना केअर सेंटरमध्ये १२० रुग्णांची क्षमता असून सध्या येथे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोना केअर सेंटर वाढविण्याबरोबरच कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात वाढविले ऑक्सिजन बेड
अनेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्याने प्रशासनाने ऑक्सिजन बेडची संख्या वाढविली आहे. आयटीआय रुग्णालयात ११० ऑक्सिजन बेड उपलब्ध असून त्यापैकी १०६ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच गंगाखेड येथे नव्याने २० ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले. या सर्व बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. सेलू येथे आठ ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत. परंतु, मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ऑक्सिजन बेड सध्यातरी रिक्त आहेत.