शहरातील डिग्गी बालाजी मंदिर, बारबिंड गल्ली येथील राम मंदिर, गांधी पार्क येथील राम मंदिर, प्रल्हाद राम मंदिर आणि वसमत रोड भागातील एक अशा पाच मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. या सर्व ठिकाणी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला होता. मागील नऊ दिवसांपासून रामनवमीचा नवरात्र उत्सव येथे पार पडला. बुधवारी सकाळी या मंदिरांमध्ये केवळ पुजाऱ्यांच्या हस्ते अभिषेक, राम जन्म आणि पालखी सोहळा पार पडला. जिंतूर रोडवरील प्रल्हाद राम मंदिर येथे तहसीलदार संजय बिरादार आणि पोलीस अधिकारी यांनी भेट दिली. भाविकांविना मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. तसेच घरोघरी बुधवारी दुपारी १२ वाजता राम नामाचा गजर करीत पूजा करण्यात आली.
शोभायात्रेला मुकले परभणीकर
परभणीत दरवर्षी रामनवमीला शोभायात्रा काढण्यात येते. अगदी भव्य स्वरुपात एक महिना तयारी करून ही शोभायात्रा आयोजित केली जाते. मागील वर्षी आणि यंदा अशी सलग दोन वर्षे परभणीकर शोभायात्रेला मुकले आहेत.