कापूस खरेदीची प्रतीक्षाच
परभणी : भारतीय कपास निगम लि. अर्थात सीसीआयच्या वतीने परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, मानवत या ठिकाणी कापूस खरेदी सुरू केली आहे. मात्र, परभणी शहरात गेल्या पाच वर्षांपासून कापूस खरेदी बंद आहे. कापूस फेडरशेनच्या वतीने अद्यापर्पंत केवळ नोंदणी सुरू केली आहे. मात्र, कापूस खरेदी सुरू झाली नसल्याने प्रतीक्षा कायम आहे.
बसच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
परभणी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी आगारातील निम्म्यापेक्षा अधिक बसेसची बिकट अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावरून धावणाऱ्या बसेसमध्ये सर्रास बिघाड होत असून, प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आगारात दुरुस्तीसाठी लावण्यात आलेल्या बसेस वेळेत दुरुस्त हाेत नसल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.
पीक विम्याची रक्कम द्या
परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण होवून राज्य शासनाने मदतही अदा केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत रिलायन्स विमा कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कुठलेही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे तत्काळ पीक विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी होत आहे.
अपघाच्या घटना वाढल्या
परभणी : जिल्ह्यात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आठवडाभरात तीन अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये वाहनधारकांना जीवही गमवावा लागला. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीकडे सा. बां. विभागाने लक्ष देवून तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
कामांना गती द्या
परभणी : जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत १५० हून अधिक रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, पाऊस व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कामे संबंधित कंत्राटदाराकडून बंद केली होती. मात्र, आता अनलॉक सुरू झाले असून, पावसाळाही संपला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी रस्त्याची कामे सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.
हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ
परभणी : सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात सात ठिकाणी नाफेडकडून शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. मात्र, खाजगी बाजारपेठेत हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी नोंदणी करूनही हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली आहे.