ऑनलाइन लोकमत
गंगाखेड (परभणी), दि. 1 - परळीहून गंगाखेडकडे येणा-या दुचाकीची पडेगाव पाटीजवळ एसटी बसशी धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे.
एमएच ०९ डीके-९०८५ क्रमांकाची दुचाकी परळीहून गंगाखेडकडे येत होती. गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही दुचाकी पडेगाव पाटीजवळ आली असता, गंगाखेडहून परळीकडे जाणाऱ्या एमएच २० बीएल-३५७४ या क्रमांकाच्या चंद्रपूर-अंबेजोगाई बसची दुचाकीशी धडक झाली.
या अपघातात दत्ता सीताराम राठोड (वय २३) हा दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील संदीप माधवराव बनबटे (वय २५) हा युवक गंभीर जखमी झाला होता.
दरम्यान, उपचारासाठी त्याला परभणी येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी गंगाखेड पोलीस दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात दुपारी १२ वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.