परभणी :आत्मनिर्भर भारत निर्मितीमध्ये ग्रामस्तरावर मृदा, पाणी, वनस्पतींचे शिक्षण, संशोधन पोहचविणे हे शाश्वत शेतीचे महत्वाचे धोरण आहे. त्याचबरोबर कृषी संशोधन व विस्तारासंबंधित पुस्तकरुपी ज्ञान प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणीच्या वतीने बदलत्या हवामानातील अद्ययावत शेतीत मृदा आरोग्य व्यवस्थापनाचा नावीन्यपूर्ण दृष्टिकोन या विषयावर ५ सप्टेंबर ते ५ डिसेंबर प्रत्येक रविवारी ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी डॉ. सुरेशकुमार चौधरी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी, माजी संचालक डॉ. एस.पी. वाणी, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, डॉ.प्रवीण वैद्य यांची उपस्थिती होती. या व्याख्यानमालेत हैदराबाद येथील इक्रीसॅट संस्थेचे माजी संचालक डॉ. एस.पी. वाणी यांनी मृद शास्त्रज्ञांनी संशोधनाबरोबरच कृषी विस्तार कार्यांमध्ये सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. कृषी संशोधन व कृषी विस्तार या दोन गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोनाच्या प्रादुर्भावात आयोजित व्याख्यानमालेमुळे मातीच्या आरोग्याबाबत शेतकरी, शास्त्रज्ञ, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना निश्चित उपयुक्त माहिती मिळाली. शाश्वत शेती क्षेत्रात हवामान आधारित स्मार्ट तंत्राचा शेतकऱ्यांनी योग्य उपयोग केल्यास उत्पादनात वाढ होईल, असे मत अध्यक्षीय समारोपात कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी मांडले. डॉ. प्रवीण वैद्य यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पपिता गौरखेडे यांनी सूत्रसंचालन केले.
देश-विदेशातील १९० शास्त्रज्ञ, संशोधक सहभागी
परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत देश-विदेशातील १९० शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. शास्त्रज्ञ डॉ. डी.के. पाल, डॉ. एस.पी. वाणी, डॉ. ए.के. पात्र, डॉ. पी.चंद्रशेखर राव, डॉ. च.श्रीनिवास राव, डॉ. डी.एल.एन.राव, डॉ. दीपक रंजन बिसवास, डॉ. तपस भट्टाचार्य, डॉ. सुरेशकुमार चौधरी, डॉ. देबाशीस चक्रबोर्ती यांची या व्याख्यानमालेत व्याख्याने झाली.