कोरोनाच्या काळात शासनाकडून शेतकऱ्यांपर्यत माहिती पोचहविण्यास अडथळा निर्माण झाला होता. शेतकऱ्यांना शेती विषय माहिती मिळावी, त्याचबरोबर पारंपारिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीची कास शेतकऱ्यांनी धरावी, यासाठी श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास दिंडारी प्रणित केंद्राच्या वतीने सेलू तालुक्यातील रायपूर येथील रायरेश्वर मंगल कार्यालयात २७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात केंद्राचे संदीप देशमुख, तहसीलदार बालाजी शेवाळे, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंढरीनाथ लखम्मवार, पंजाबराव डख, सेंद्रीय शेती अभ्यासक दादाराव राऊत आदींची उपस्थिती होती. यावेही महसूल प्रशासनाच्या वतीने या मेळाव्यात ई-पीक पाहणी, उद्योग प्रक्रिया, शेतीपूरक जोड व्यवसाय आणि देशी व गावरान बियाणे याबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विषयक विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही यावेळी महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
गाण्यातून मांडल्या शेतकरी समस्या
रायपूर येथील महोत्सवात विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व व्यथा आपल्या गाण्याच्या सादरीकरणातून मांडल्या. हा एकदिवशीय कृषी महोत्सव शेतकऱ्यांना शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी लाभदायक ठरणारा असेल, अशीच प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत होत्या.