देवगावफाटा : तालुक्यात अंगणवाडीचा कारभार आता ऑनलाइन करण्यात आला आहे. त्यानुसार अंगणवाडीताईंना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. मात्र या मोबाईलला नेट पॅक रिचार्ज करण्यासाठी सेविकांना दिला जाणारा तीन महिन्यांसाठीचा ४०० रुपयांचा भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे बहुतांश मोबाइल हे नॉटरिचेबल झाल्याचे दिसून येत आहे.
सेलू तालुक्यात १५५ अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये १० हजार ९८४ लाभार्थी आहेत. यासाठी सद्य:स्थितीत १५१ अंगणवाडी कार्यकर्ती व १४० मदतनीस कार्यरत आहेत. ० ते ६ वयोगटातील बालकांना आहार वितरित करण्यापासून ते पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे. या शिवाय स्तनदा माता, गरोदर माता यांच्या आरोग्याची देखभाल करून त्यांना वेळेवर लसीकरण देण्याचे काम अंगणवाडीतून केले जाते. या कामकाजासाठी या विभागाकडून अंगणवाडी सेविकांना ॲण्ड्रॉईड मोबाइल देण्यात आले आहेत. त्याचबरोबरच नेटपॅक रिचार्जकरिता त्यांना प्रत्येक तीन महिन्यांसाठी ४०० रुपये दिले जातात. परंतु, जानेवारी ते मार्च २०२१ या काळातील रिचार्ज भत्ता अद्यापही अंगणवाडी सेविकांना मिळाला नाही. ज्यांनी पदरमोड करून स्वत:च्या पैशाने रिचार्ज केले आहेत, त्यांचे मोबाइल सुरू आहेत. परंतु, अर्ध्याहून अधिक अंगणवाडीताईंचे मोबाइल नॉटरिचेबल असल्याचे दिसून येत आहे. शासन एकीकडे ऑनलाइन कारभारासाठी प्रयत्न करीत असताना दुसरकीडे मात्र अंगणवाडी सेविकांना वेळेवर मोबाइल रिचार्ज भत्ता मिळत नसल्याने या कामात व्यत्यय येत आहे.
अंगणवाडीताईंना बसतेय आर्थिक झळ
मोबाइल कंपन्यांकडून तीन महिन्यांच्या नेटपॅकच्या दरामध्ये मोठी वाढ केली आहे. मात्र अंगणवाडी विभागातून अंगणवाडी सेविकांना तीन महिन्यांसाठी ४०० रुपयांचाच रिचाज भत्ता दिला जातो. त्यामुळे मार्च महिन्यांपासून २०० रुपयांची वाढ करून आगामी काळात अंगणवाडी सेविकांना ६०० रुपयांचा मोबाइल रिचार्ज भत्ता देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.