कोरोनाच्या बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जात आहेत. त्याचा अवलंब ही केला जात आहे. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी घरच्या घरी किंवा आहे त्या ठिकाणी बसून प्राणायाम केल्यास फुफ्फुसांची क्षमता वाढते. पर्यायाने फुफ्फुसांना जास्तीचा ऑक्सिजन पुरवठा झाल्यावर कोरोना होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. योगासन, प्राणायाम, सूर्यनमस्कार यांच्यापैकी जे जमेल त्याचा सराव करुन शरीराला निरोगी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अवलंब करणे गरजेचे आहे.
नियमित प्राणायाम केल्याचे फायदे
श्वासावर नियंत्रण मिळविता येते.
दीर्घ श्वसन केल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते
रोग प्रतिकारशक्ती वाढते
मन शांत आणि स्थिर राहते
ताण-तणाव जाणवत नाही
ही आसने करावीत
शंशाकासन, भूजंगासन, खांद्याची चक्राकार हालचाल, हस्तपद्मासन, प्राणायाम, सूर्यभेदन, अनुलोम-विलोम, उजैयी प्राणायाम, पवनमुक्तासन, ओंकार, ध्यान केल्यास फायदा होतो.
सकाळी झोप झाल्यावर लगेच योगा-प्राणायाम न करता आधी शरीर सैल पडण्यासाठी वाॅर्म-अप करावे, त्यानंतर दिवसभरात कधीही प्राणायाम करता येतो. यामध्ये दीर्घ श्वसन करणे अत्यंत महत्त्वाचे. श्वास घेणे, रोखणे आणि नंतर सोडणे ही क्रिया करणे गरजेचे आहे. त्याचा फायदा फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यास होतो. मी १० वर्षापासून घरी प्राणायाम करतो.
- गंगाधर पवार, नियमित योगसाधक.
केवळ कोरोनाच नव्हे तर सर्वच आजारांवर मात करण्यासाठी योगा, प्राणायाम गरजेचा आहे. २००८ पासून मी घरी रोज सकाळी एक तास योगक्रिया आणि प्राणायाम करतो. दवाखाना आणि औषधीविना राहण्यासाठी प्राणायाम, योगासन फायदेशीर आहे. ज्यांनी योग अभ्यास शिकला नाही, त्यांनी अगदी सोपी आसने आणि प्राणायाम नियमित करावा. त्याचा फायदा रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास होतो.
- मयूर साळापूरीकर, नियमित योगसाधक.