मनपाच्या मालमत्ता कराची वसुली जेमतेम १५ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, मागील आर्थिक एक वर्ष संपल्याने या वसुलीला आता प्रतिसादही मिळेनासा झाला आहे.
मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेवर महानगरपालिकेचा कारभार चालविला जातो. येथील मनपाला कराव्यतिरिक्त दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे कर वसुली प्राधान्याने करणे गरजेचे असताना मागील दोन वर्षांपासून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मनपा प्रशासनाला त्याचा मोठा फटका सहन करावा लागला.
महापालिकेने घेतलेल्या नोंदीनुसार शहरात एकूण ७५ हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कराची वसुली केली जाते. दरवर्षी ३० कोटी रुपयांपर्यंतचा कर मनपाला वसूल होणे अपेक्षित आहे; परंतु १०० टक्के कर वसुली होत नाही. यावर्षी तर ऐन मार्च महिन्याच्या तोंडावरच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कराच्या वसुलीला मोठा फटका बसला आहे. मागील बाकी वगळता चालू वसुलीही १५ ते २० टक्क्यांपर्यंतच झाली आहे. मागील आर्थिक वर्ष आता संपले असून, नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ झाला आहे; परंतु तरीही मागील वर्षीची करवसुली अद्याप पूर्ण झालेली नाही. कराची वसुली थकल्याने नागरिकांना सुविधा पुरविताना मनपाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय मनपा कर्मचाऱ्यांचे पगार, कार्यालयीन खर्च या बाबींची जुळवाजुळव करताना अडचणींचा डोंगर उभा राहात आहे. त्यामुळे यावर्षी तरी कराच्या वसुलीवर अधिक भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.