परभणी : जिल्ह्यातील विविध भागांत ११ घरफोड्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली.
जिल्ह्यातील विविध भागांत घरफोडी व दरोड्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये घडले होते. १५ मार्च रोजी पालम तालुक्यातील चाटोरी येथील एका आखाड्यावर अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडून सुरू होता. तपासा दरम्यान सदरील चोरटे चाटोरी येथील एका सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यानुसार सदरील आरोपी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील श्रीनाथ उर्फ अशोक कांचा भोसले असल्याचे समजले. त्यावरून स्थागुशाच्या पथकाने श्रीनाथ भोसले याला ताब्यात घेतले. (कोठून व केव्हा ताब्यात घेतले हे सांगता येत नाही, अशी माहिती पोलीस अधोक्षक जयंत मीना यांनी दिली.) त्यानंतर त्याची कसून चौकशी कली असता, त्याने पाथरी, पालम पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येकी २, गंगाखेड पोलीस ठाण्यांतर्गत ५ आणि मानवत व पिंपळदरी पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येकी १ अशा ११ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून २५ तोळे सोने व १ हजार ७२५ ग्रॅम चांदी असा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला मानवत पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, येथील पोलीस उपनिरीक्षक तुकडे पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई स्थागुशाचे सपोनि व्यंकटेश आलेवार, गुलाब बाचेवाड, साईनाथ पुयड, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिरसेवाड, पोलीस कर्मचारी साईनाथ जक्केवाड, बालासाहेब तुपसमुद्रे, अरुण पांचाळ, किशोर चव्हाण, अजहर शेख, दिलावर खान पठाण, गणेश कौटकर, राम घुले आदींच्या पथकाने केली.