झरी (जि.परभणी) : परभणी-जिंतूर रस्त्यावरील शेक पाटीजवळ भरधाव वेगातील कारने दिलेल्या धडकेत उपचारादरम्यान लेकी पाठोपाठ वडिलांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रिसोड येथील किरण चौधरी हे २२ फेब्रुवारीला मुलगी कल्याणी हिला परभणीत उपचारास घेऊन आले होते. उपचार केल्यानंतर दुचाकीवर क्रं (एमएच ३७ एजे १६४४) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गावाकडे जाताना परभणी-जिंतूर मार्गावर शेक पाटीजवळ भरधाव वेगात आलेल्या कार (एमएच १२ एनबी ३९०३) ने चौधरी यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात किरण चौधरी व मुलगी कल्याणी हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता कल्याणी हिचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला तर त्यापाठोपाठ रात्री उशिरा अकराच्या सुमारास किरण चौधरी यांचा देखील मृत्यू झाला. या प्रकरणी महेश गुलाबराव येरकर (रा.परभणी) यांच्या तक्रारीनुसार ग्रामीण पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर कारचालक कारसह फरार झाला आहे.