राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या ४ आगारांमध्ये २६६ बस आहेत. यातील बहुतांश बस या मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास पूर्ण करावा लागतो. विशेष म्हणजे चार आगारांतील बसच्या दुरुस्तीसाठी वर्षाला ६ कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यातच आता मागील वर्षभरापासून वारंवार लॉकडाऊन जाहीर करण्यात येत असल्याने या चारही आगारांतील बस एका जागेवरच उभ्या राहत आहेत. त्यामुळे नादुरुस्त बसमध्ये आणखीनच भर पडली आहे. काही बसच्या काचा निखळल्या असून, काही बसचे शीट फाटले आहेत. त्यामुळे अगोदरच कोरोनामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या एसटी महामंडळ प्रशासनाला बसची दुरुस्ती करण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. त्यामुळे यावर्षी बसच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या निधीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे शनिवारी परभणी येथील आगारात बसची पाहणी करताना दिसून आले. परभणी जिल्ह्यातील चार आगारांतील २६६ बसच्या नियमित दुरुस्तीसाठी ६ कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी वर्षभरापासून काही बस एका जागेवरच उभे होत्या. तसेच दुसऱ्या लाटेत तीन महिने बस आगाराच्या बाहेर काढता आल्या नाहीत. सध्या दोन महिन्यांपासून या बस रस्त्यावरून धावत आहेत. मात्र, या बस दुरुस्तीसाठी खर्च वाढला आहे. परिणामी वर्षाकाठी साडेसहा कोटी रुपयांचा खर्च बस दुरुस्तीसाठी होण्याची शक्यता आहे.
बसची नियमितपणे देखभाल दुरुस्ती करण्यात येते. वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार बसच्या दुरुस्तीसह इतर कामकाज कर्मचाऱ्यांकडून नियमित केले जातात.
मुक्तेश्वर जोशी, विभागीय नियंत्रक, परभणी