२१ रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार
परभणी : शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या कोरोनाचे २१ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये २९, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात ७, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात ७ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयातील रुग्णांची संख्या घटल्याने मोठ्या प्रमाणात खाटा रिक्त झाल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी १ हजार ७६७ खाटांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ६४६ खाटा सद्यस्थितीला रिक्त आहेत.
७९ हजार नागरिकांच्या जिल्ह्यात तपासण्या
परभणी : जिल्ह्यातील ७९ हजार २४३ नागरिकांच्या आरोग्य विभागाने तपासण्या केल्या आहेत. त्यात ५४ हजार १९२ तपासण्या रॅपिड टेस्टच्या साह्याने आणि २५ हजार ५१ नागरिकांच्या तपासण्या आरटीपीसीआरच्या साह्याने झाल्या आहेत. एकूण तपासण्यांपैकी ७१ हजार ३५८ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. ७ हजार २९७ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ४८९ नागरिकांचे अहवाल अनिर्णायक असून, ९९ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेने नाकारले आहेत.