परभणी : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून, त्याअंतर्गत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ४० खाटांचा बाल रुग्ण कक्ष उभारण्यात आला आहे. रविवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या लाटेमध्ये बालकांवर अधिक परिणाम होण्याची शक्यताही वर्तविली आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ५० ऑक्सिजन खाटांसह अद्ययावत असा बालरुग्ण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षात सर्वच्या सर्व काटा ऑक्सिजनसह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे औषधी आणि इतर अनुषंगिक तयारीदेखील प्रशासनाने केली आहे.
३० मे रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, बालरोग तज्ज्ञ डॉ. विशाल पवार, डॉ. मोईज, डॉ. संदीप मोरे, जाकीर, मीना देशमुख, पाटील आदींची उपस्थिती होती. या कक्षामध्ये संभाव्य तिसऱ्याला लाटेत कोरोनाबाधित बालकांवर उपचार केले जाणार आहेत.
पूर्वतयारीसाठी समिती स्थापन
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले व नवजात शिशूंना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यादृष्टीने पूर्वतयारी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. डॉ.विशाल पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीत डॉ.किशोर सुरवसे, डॉ. सागर मोरे, डॉ. किरण सगर, संदीप मोरे आदींचा समावेश आहे. कोरोनामुळे बालके व नवजात शिशू यांना संसर्ग झाल्यास उपचाराकामी किती आईसीयू खाटा लागतील, एनआयसीयू, ऑक्सिजन खाटा, साध्या काटा किती लागणार आहेत? याविषयीचे अंदाजपत्रक ही समिती तयार करणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरमध्ये सेटिंग करून हे व्हेंटिलेटर बालकांना वापरले जाऊ शकतात का? याविषयीही ही समिती अभ्यास करणार आहे. तसेच नवजात शिशूसाठी लागणारे व्हेंटिलेटर, मास्क, औषधी व इतर साहित्यांचाही अहवाल समितीकडून घेतला जाणार आहे.
कर्मचाऱ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण
आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि परिचारिकांना बालकांवर उपचार करण्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्थानिक पातळीवर हे प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच विभागीय स्तरावर नांदेड आणि औरंगाबाद येथेही ७ जूनपासून प्रशिक्षण सुरू होणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठविले जाणार असल्याची माहिती मिळाली.