परभणी : जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत रविवारी अल्पशी घट झाली. दिवसभरात ४८९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, आठजणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. १८ एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयातील चार आणि खासगी रुग्णालयातील चार अशा आठ रुग्णांचा मृत्यू झाला.
रविवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अल्प प्रमाणात घटली. आरोग्य विभागाला १ हजार ५६८ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार ३४ अहवालांमध्ये ३३३ आणि रॅपिड अँटिजन टेस्टच्या ५३४ अहवालांमध्ये १५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजार ५१४ झाली असून, १९ हजार १४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ६३१ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ५ हजार ७३४ रुग्ण उपचार घेत आहेत.
येथील जिल्हा रुग्णालयात १४८, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५४, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २५२, अक्षदा मंगल कार्यालयात १५७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये ११७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४ हजार ५२० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
कोरोनामुक्तीचा वाढला आलेख
कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी ६८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.