परभणी : उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे विजेची मागणी वाढते. मात्र, यावर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिक घरातच राहिल्याने २० कोटी रुपयांची जास्त वीज परभणीकरांनी वापरली आहे. त्यामुळे अतिरिक्त वीपुरवठा करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली.
परभणी जिल्ह्याला वीजपुरवठा करताना महावितरण कंपनीला सर्वसाधारणपणे ३ महिन्यांसाठी १०० मिलियन युनिट (एमयूएस) लागते. उन्हाळ्यामध्ये ही मागणी वाढत जाते. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अधिकारी वाढत्या विजेची मागणी वरिष्ठ स्तरावर नोंदवतात. त्यानुसार पुरवठाही करण्यात येतो. मात्र, ही सर्व प्रक्रिया मार्च महिन्याच्या नंतर सुरू होते; परंतु यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर बहुतांश नागरिकांनी घरातच राहण्यास पसंती दिली. परिणामी, घरोघरी कूलर, फॅन, टीव्ही, फ्रीज यासह इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढला. दिवसभर आणि रात्रीही कूलर्स आणि फॅनचा वापर होतो. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांमध्ये ४५९ मिलियन युनिट विजेचा वापर जिल्ह्यामध्ये झाला आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात १७० मिलियन युनिटस्, फेब्रुवारी महिन्यात १३५, तर मार्च महिन्यात १५४ मिलियन युनिटस्चा वापर परभणीकरांनी केला आहे. सर्वसाधारणपणे महिन्याकाठी परभणीकर जवळपास शंभर युनिटस्चा दर महिना वापर करतात. मात्र, कोरोना काळात तीन महिन्यांत १५९ मिलियन युनिटस्चा जास्तीचा वापर केला आहे.
दरम्यान, कोरोना काळात विजेची मागणी वाढत गेली; परंतु मागणी तसा पुरवठा होत असल्याने महावितरण कंपनीने कोरोना काळात भारनियमन केले नाही. विशेषकरून शहरी भागात भारनियमन करण्याचे टाळले. त्यातच राज्य शासनानेही कोरोना काळात भारनियमन टाळण्याचे आवाहन महावितरणला केले होते. त्यामुळे कोरोनापाठोपाठ आता उन्हाळ्यातही अतिरिक्त विजेचा भारही जिल्ह्यातील महावितरणला सहन करावा लागणार आहे.
महिन्याकाठी ३ कोटी ५० लाख युनिटस्चा वापर
महावितरण कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतिमहिन्याला सर्वसाधारणपणे १०० एमयूएस युनिट वीज जिल्ह्याला लागते. ही एका महिन्यातील जिल्ह्याची सरासरी विजेची मागणी आहे; परंतु उन्हाळा आणि कोरोना काळात विजेची मागणी वाढली. प्रत्येक महिन्यामध्ये सरासरी ३५ मिलियन युनिट जास्तीची वीज लागली. एका मिलियन युनिटमध्ये दहा लाख युनिटस्चा समावेश असतो. हा हिशोब करता महिन्याकाठी ३ कोटी ५० लाख युनिट वीज जिल्ह्याने वापरली आहे. तीन महिन्यांत १५९ मिलियन युनिटचा जास्तीचा वापर करून १५ कोटी ९० लाख युनिट वीज जिल्ह्यासाठी वापरण्यात आली.