परभणी : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात घटला आहे. सोमवारी ११ हजार ३०० नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात ४०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने मागील दोन आठवड्यांपासून तपासण्यांची संख्या वाढविली आहे. दोन दिवसांपासून १० हजारपेक्षा अधिक नागरिकांचे अहवाल प्राप्त होत आहेत. मात्र, त्यात बाधित असलेल्या रुग्णांची संख्या चारशे ते पाचशेपर्यंत मर्यादित असल्याने हा संसर्ग मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसत आहे. २४ मे रोजी आरोग्य विभागाला ११ हजार ३०० नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ४०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या ११ हजार २४ अहवालांमध्ये ३६६ आणि रॅपिड टेस्टच्या २७६ अहवालांमध्ये ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ हजार ९०९ झाली असून, त्यापैकी ४३ हजार ९२० जण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २१० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ६७९ रुग्ण उपचार घेत आहेत.
मृत्यूचे प्रमाण मात्र घटेना
बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र अद्यापही घटलेले नाही. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंता कायम आहेत. सोमवारी १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयातील ४, आयटीआय हॉस्पिटलमधील ४, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ३ आणि खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या १२ रुग्णांमध्ये १० पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.
१२६ जणांना सुट्टी
सोमवारी १२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या रुग्णांना कोरोनाची लक्षणे नसल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.