कोरोनामुळे आई व वडिलांचा मृत्यू झालेल्या अनाथ बालकांना राज्य शासनाने त्याच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला; परंतु कोरोनानेच आई किंवा वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांबाबत कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. त्यामुळे या बालकांना शासनाने वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अशी एकूण २०७ बालके आहेत. यातील बहुतांश बालकांचीही आर्थिक स्थिती नाजूक असल्याने त्यांनाही मदतीची गरज आहे; परंतु शासन या बालकांकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने या बालकांमध्येही अन्यायाची भावना आहे.
कुटुंबाचा आधारच गेला...
सोनपेठ तालुक्यातील वाणीसंगम येथील परमेश्वर कांबळे (वय ४२) यांचे कोरोनाने काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे. परमेश्वर कांबळे हे वाहनचालक म्हणून काम करीत होते. त्यांना शेती नाही. घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यांच्या निधनाने कांबळे कुटुंबीयांचा आधारच गेला आहे. त्यांच्या एका मुलीचे लग्न झालेले आहे. आणखी एक मुलगी दहावीत, तर मुलगा नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आता काय करावे, असा प्रश्न या कुटुंबीयांना पडला आहे. शासनाने या मुलांच्या शिक्षणाची सोय केल्यास तसेच त्यांना अर्थिक मदत केल्यास कुटुंबीयांना थोडाफार आधार मिळणार आहे. त्यामुळे शासनाने यासाठी व्यापक भूमिका घेणे गरजेचे आहे.
वडिलांचे छत्र हरपले...
पालम तालुक्यातील पारवा येथील मारोती येवले (वय ४३) यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले आहे. १७ वर्षांचा मुलगा आणि १४ वर्षांची मुलगी हे सध्या शिक्षण घेत आहेत. मारोती येवले हे गायरान जमीन कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या निधनाने येवले कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. मुलांचे शिक्षण कसे करावे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. वडिलांचे छत्र हरविलेली त्यांची दोन्ही मुले चांगलीच अस्वस्थ झाली आहेत; तर त्यांच्या पत्नींना मुलांचे कसे होईल, याची चिंता सतावत आहे. त्यांनाही शासनाने नियम बाजूला सारून मदत देण्याची भूमिका घेतली पाहिजे.
कुटुंबच आले अडचणीत
पालम तालुक्यातील रावराजूर येथील मुंजा वेणू काळे (वय ४५) यांचे कोरोनाने ८ मे रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. मुंजा काळे हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. कुटुंबात ते एकटेच कमावते असल्याचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यावरच अवलंबून होते. त्यांच्या निधनाचे संपूर्ण काळे कुटुंब अडचणीत सापडले आहे. मुलीचे लग्नाचे वय झाल्याने व घरातील कर्ता पुरुषच नसल्याने मुलीचे लग्न कसे करावे? अन्य मुलांचे शिक्षण कसे करावे? असा प्रश्न त्यांच्या पत्नी व आईंना पडला आहे. रोज काम करून उपजीविका भागविणाऱ्या या कुटुंबाचा आधारवड गेल्याने शासनाच्या मदतीची अशा कुटुंबाला अधिक मदतीची गरज आहे; परंतु शासन नियमांचा फटका या कुटुंबालाही बसण्याची शक्यता आहे.
दोघाजणांचे आई-वडिलांचे छत्र हरपले
जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचे आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. त्यांतील एकाचे वय १९ वर्षांपेक्षा अधिक आहे; तर दुसऱ्याचे वय १७ वर्षे आहे. दोन्ही अनाथ मुलांच्या नावावर शासन एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवणार आहे. तसेच कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेली अनाथ मुले सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन खर्च शासन उचलणार असल्याचे जाहीर केले असले तरी एक मुलगा सक्षम असल्याने त्याच्या शिक्षणाचा खर्च शासन उचलण्याची शक्यता कमीच आहे. दुसऱ्या मुलाचे शिक्षण मात्र शासनाकडून होऊ शकते.