परभणी : कोरोना लसीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांपैकी तब्बल १० टक्के नागरिकांनी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे नोंदणीनंतरही या तरुणांचे लसीकरण झाले नाही. दुसरीकडे ४५ वर्षांपेक्षा पुढील नागरिकांनी मात्र दुसऱ्या डोससाठी जागोजागी रांगा लावल्याचे चित्र आहे.
१ मेपासून १८ ते ४४ या वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले आहे. या वयोगटासाठी को-विन ॲपवर ऑनलाईन नोंदणी करून लसीकरण केंद्र, लसीकरणाची तारीख आणि वेळ स्वत: लाभार्थ्यालाच निवडावयाचा आहे. अशा पद्धतीने नोंदणी झालेल्यांनाच लस मिळत आहे. शहरी भागात या लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन नोंदणी करताना अवघ्या काही मिनिटांतच बुकींग फुल्ल होत आहे. मात्र, असे असले तरी आतापर्यंत नोंदणी करून लसीकरण केंद्र व तारीख निवडलेल्या लाभार्थ्यांपैकी १० टक्के नागरिक लसीकरण केंद्राकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे त्या त्या दिवशी या नागरिकांसाठी राखीव ठेवलेली लस त्या दिवशी वापरता आली नाही. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे ४५ वर्षांपुढील नागरिक मात्र लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच रांगा लावून लस घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या जिल्ह्यात ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी लसीकरण सत्र चालविले जात आहे. शहरात महापालिकेच्या सर्वच केंद्रांवर ज्येष्ठांच्या रांगा लागल्याचे दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. लसीची नोंदणी करूनही लस न घेणाऱ्यांची संख्या १० टक्क्यांपर्यंत असल्याने अजूनही तरुणांमध्ये लस घेण्यासाठी तेवढा उत्साह नसल्याचे दिसत आहे.
डोस जात नाही वाया
नोंदणी करूनही लाभार्थी लसीकरण केंद्रावर आला नाही तर त्याच्यासाठी राखीव ठेवलेला डोस वाया जात नाही. त्या दिवसापुरता हा डोस राखीव ठेवला जातो. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात तो इतरांना दिला जातो.
जिल्ह्यात १६ केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण केले जात आहे. त्यापैकी सर्वच केंद्रांवर दररोज निश्चित केलेल्या कोट्याप्रमाणे लसीकरण झाले नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
सकाळी सातपासूनच रांगा
परभणी शहरात ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी दुसरा डोस दिला जात आहे. मंगळवारी लस घेण्यासाठी मनपाच्या अनेक केंद्रांवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. आता लस देण्यासाठी टोकण पद्धत सुरू करण्यात आली आहे. तरीही नागरिक सकाळी ७ पासूनच केंद्रावर दाखल होऊन टोकण घेत आहेत.
परभणी शहरातील आठही केंद्रांवर नागरिकांचा मोठा प्रतिसाद
शहरात ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी ८ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. खंडोबा बाजार, इनायतनगर, खानापूर, जायकवाडी या सर्वच केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. टोकण पद्धतीमुळे सकाळी ७ ते १० या वेळेत नागरिकांनी टोकण घेतले. सकाळी ११ वाजल्यापासून मात्र प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली होती. बुधवारी मात्र गोंधळ झाला नसल्याचे दिसून आले.