परभणी : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आपले प्रश्न प्रशासनदरबारी मांडून त्यांची सोडवणूक करून घेण्यासाठी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकांनी आंदोलने केली. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गजबजून गेला होता.
घरकुल योजनेंतर्गत मंजूर झालेले घरकुल बांधकाम करण्यासाठी वेळेवर वाळू दिली जात नसल्याने प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी निलेश जगतकर यांनी जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू केले आहे. महापालिका वाळू उपलब्ध करून देत नसल्याने घरकुलाचे बांधकाम थांबले. महापालिकेच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी जगतकर यांनी हे उपोषण सुरू केले आहे. जिजामाता रोड भागातील माणिक ढाकरगे यांनी मंडळ अधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषण केले आहे. पेडगाव येथील अतिरिक्त कार्यभार असलेल्या मंडळ अधिकाऱ्याची बेकायदेशीर नियुक्ती रद्द करून मूळ पदस्थापनेवर नियुक्त करावे, अशी त्यांची मागणी आहे. पूर्णा येथील तत्कालीन कृषी अधिकाऱ्याविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सुरेश खरात, शजवाज गायकवाड, गौतम रानबा, ज्ञानोबा गायकवाड यांनी उपोषण सुरू केले आहे. तत्कालीन कृषी अधिकाऱ्यांनी पूर्णा येथे कार्यरत असताना सिंचन विहिरींचे मस्टर काढताना ज्यांनी लाच दिली, त्यांचेच मस्टर काढल्याचा आरोप उपोषण करणारांनी केला आहे. तसेच तक्रारी केल्यास उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तेव्हा तालुका कृषी अधिकाऱ्याची चौकशी करावी, या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन
दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र शासनाचे अन्यायकारक तीन कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मुख्य मागणीबरोबरच सोनपेठ तालुक्यातील वाणी संगम येथे रोहयो कामाची मागणी करणाऱ्या महिला मजुरांना पाणंद रस्त्याचे काम तत्काळ सुरू करून रोजगार द्यावा. परभणी, मानवत, जिंतूर तालुक्यांत पाणंद रस्त्याची कामे सुरू करावीत. मजुरी दरपत्रकात सुधारणा करावी, आदी मागण्या केल्या आहेत. कॉ. राजन क्षीरसागर, शिवाजी कदम, माणिक कदम, सय्यद इब्राहिम, मुरली पाघन, अप्पा कुराडे, शेख अब्दुल, लक्ष्मण घोगरे, प्रकाश गोरे, प्रसाद गोरे आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
विद्युत रोहित्रासाठी ग्रामस्थांचे उपोषण तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे स्वतंत्र विद्युत रोहित्र उभारावे, या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. रोहित्र बंद असल्याने मागील ११ महिन्यांपासून विद्युतपुरवठा बंद आहे. त्याचप्रमाणे पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. महावितरण कोणतीही कारवाई करीत नसल्याने निलेश डुमणे, गजानन वाघमारे, सुनील वाघमारे, अर्जुन सामाले, अशोक शिंदे, राजकुमार दंडवते आदींसह ग्रामस्थांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे.