काय लिहावं आज? काहीच का बरं सुचत नाहीये?इतरवेळी डोकं कसं नुसतं ओसंडून वाहत असतं. किती काय काय विचार चालू असतात एकाच वेळी. आज मात्र सगळं थंड आहे. एखाद्या चुकार विचाराचादेखील मागमूस नाही! गंमतच आहे! जेव्हा डोकं सतत विचारांनी भरलेलं असतं तेव्हा वाटतं, पुरे झाले विचार, जरा शांतता हवी! आज डोकं एकदम चिडीचूप शांत आहे तर मला विचार हवेयत... ता - ना - ना - न - ना, या गाण्याबद्दल लिहावं का? सारखं सारखं आठवतंय. अडकूनच बसलंय कधीचं डोक्यात! की या चहाच्या कपाबद्दल लिहूयात? किंवा त्यानं कागदावर उमटवलेल्या या गोल ठशाबद्दल? बाप रे, चांगलाच गरम आहे की चहा अजून. जीभ भाजली चांगलीच! अशा घाईघाईत होणाऱ्या फजितीबद्दल लिहूयात का? चहाने भाजलेली जीभ.टेबलवर उपडा झालेला पाण्याचा ग्लास.किंवा घाईघाईत उलटा घातलेला टी- शर्ट? - नको. मग? हा कागद, पेन, टेबल, पडदा, खिडकी, आभाळ.. काय असावा आजचा विषय?पुढे?... श्या!... हेही विचारचक्र काही पुढे जायला तयार नाही... का बरं?जरा जास्तच त्रास देतोय का मी डोक्याला? थोड्या वेळानं पुन्हा प्रयत्न करावा का? की आज लिहूच नये काही?- प्रसाद सांडभोर(sandbhorprasad@gmail.com)
काही सुचत का बरं नाही?
By admin | Updated: April 12, 2017 16:34 IST