when 21 years college drop-out runs his own start up | 21 वर्षांचा कॉलेज ड्रॉप आऊट उद्योगी ; ज्याची आज स्वतःची कंपनी आहे!
21 वर्षांचा कॉलेज ड्रॉप आऊट उद्योगी ; ज्याची आज स्वतःची कंपनी आहे!

ठळक मुद्देतो सांगतो, 16 व्या वर्षी माझ्या आईवडिलांनी मला हॅकिंग शिकायला हैदराबादला जाऊ दिलं. धोके पत्करू दिले, धक्के खाऊ दिले म्हणून हे जमलं!

- भूषण पाटील 

माझं वय 21 वर्षे. माझे वडील खासगी कंपनीमध्ये सेल्स ऑफिसर म्हणून काम करतात. मला आठवतंय मी आठवीत होतो, तेव्हापासून मला काही खर्चासाठी पैसे लागले तर ते मी वडिलांकडे मागयचो. पण ते नकार द्यायचे. ( परिस्थिती वाईट होती असंही काही नाही.) आधी मला त्यांचा खूप राग यायचा. वाईटही वाटायचं. पण मग हळूहळू मला वाटायला लागलं की, पैसे मागण्यापेक्षा ते मी कमावून माझ्या गरजा भागवेन. विचार तर केला परंतु काय करावं ते सुचत नव्हतं. तेव्हा मी कुसुमताई मधुकरराव चौधरी या शाळेत शिकायचो. तेव्हा माझे सर्व मित्नही त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या कामात मदत करत. कोणी भाजी विकत, कुणी नास्त्याची गाडी लावत. एकदा एप्रिल महिना होता. लग्न व बाकी सोहळे  तेव्हा खूप जोरात चालू होते. मग त्या वेळेस विचार केला की आपण वाढण्याचे ठेके घेऊ. मग आधी मी होतकरू मुला-मुलींचा एक डाटा तयार केला. ठेके घेण्यासाठी केटरिंगवाल्यांकडे जाऊ लागलो. आम्हाला काम मिळालं. त्या अनुभवातून मला कळलं की व्यवसाय कसा करतात. तेव्हापासून उद्योजक होण्याचं स्वप्न पहायला लागलो. 

अर्थात काही दिवस काम मिळालं. पण काम सिझनल आहे हे लक्षात आलं नाही. सिझनल धंदा असल्यामुळे तो फक्त पुढचे तीन महिने चालणार हा विचार केलाच नव्हता. जुलैनंतर काय, हा प्रश्न होताच. 

माझ्या एका मित्नाकडे संगणक होता. एकदा त्याच्याकडे गेलो तर तो त्यावर इंटरनेट लावून ऑकरूट पाहत होता. पुण्यात असलेल्या ताईशी तो चाट करत होता. माझ्या मनात ते पाहून काही प्रश्न  आले. ते मी त्याला विचारू लागलो. जसं की, हे वेबपेज कसं बनवतात. कुठं स्टोअर असतं. नशिबाने त्यालाही याबाबतीत थोडी माहिती होती. माझी उत्सुकता वाढू लागली.  तेच विचार मानत येऊ लागले मग ठरवलं की अजून माहिती काढू.  त्यासाठी संगणक आणि इंटरनेटची गरज होती. ते माझ्या घराजवळ नव्हतं. घरी हे पाहिजे अस सांगणं म्हणजे वडिलांची बोलणी खाणं. तरी मिळणार नाही याची खात्री. म्हणून घरी मी काही बोललो नाहीे परंतु उत्सुकता तर होतीच मग माझ्या एक मित्नाच्या काकांनी नुकताच एक फोटो स्टुडियो सुरू केला होता. त्यात त्यांना फोटोशॉप आणि व्हिडीओ एडिटिंगसाठी मुलगा लागणार होता. मला दोन्ही सॉफ्टवअर येत नसतानासुद्धा मी त्यांना जाऊन सांगितलं की मी करून देतो. हे काम खूप मोठी रिस्क होती; परंतु त्यात दोन गोष्टी होणार होत्या, एक कामाच्या मोबदल्यात थोडे पैसे पण मिळणार आणि इंटरनेट-संगणकाशी  मैत्नी करायला मिळणार होती. ते हो म्हणाले आणि माझा संगणकासोबतचा प्रवास सुरू झाला. त्यात मी ते दोन सॉफ्टवेअर फक्त तीन दिवसात शिकलो. इंटरनेटच्या माध्यमातून html, css, javascript   या गोष्टी पण आत्मसात केल्या. एक वर्ष कसं निघालं कळलंसुद्धा नाही.

मग मी माझ्या जमलेल्या पैशातून दहावीच्या सु्टीत हॅकिंग शिकण्यासाठी हैदराबादला गेलो. घरी मला याबतीत सूट होती. पैसे नको मागू, तुला जे शिकायचं ते शिक. त्यांना पण माहीत होतं की मी माझ्याकडे थोडे पैसे आहे; पण तरीही जाताना आईने तिनं साठवलेल्या पैशातून मला एक हजार रुपये आणि मोबाइल दिला.  

एवढ्या दूर हजार किलोमीटर लांब एका नवीन राज्यात 16 वर्षाचा मुलगा एकटा कसा जाईल या भीतीनेच काही पालक मुलांना जाऊ देत नाही. मुलं वीस वर्षाची होतात तरी सोडत नाहीत. पण मात्र याबाबतीत  खूप लकी होतो. सुदैवाने माझ्या आईवडिलांनी मला जाऊ दिले. मी त्या प्रवासात खूप काही शिकलो. तिथे जाऊन मी हॅकिंगही शिकलो आणि दोन महिन्यांनी परत आलो.  

वडिलांची प्रमोशनवर बदली चोपडाला होणार होती. दरम्यान एका दिवशी आमच्या गल्लीतील दादा माझ्या जवळ आले (ते एका इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये संगणक शिक्षक होते). त्यांना कोठून तरी कळलं असावं की मी नुकताच हैदराबादला जाऊन कोणतातरी कोर्स करून आलोय. त्यांनी तेव्हा विचारलं की आमच्या शाळेची एक वेबसाइट बनवायची आहे तर तू बनवशील का?

मी वेबसाइट बनवली नव्हती; पण नेहमीप्रमाणे शिकायचं नि करायचं असं ठरवलं नि त्यांना हो म्हणालो.  प्रिन्सिपल मॅडमना भेटायला गेलो. ही माझी आयुष्यातली पहिलाची क्लायंट मीटिंग. किती पैसे घ्यावेत याची काहीच कल्पना नाही. डोमेन आणि होस्टिंग काय किंवा वेबसाइट इंटरनेटला कशी टाकतात हेसुद्धा माहीत नव्हतं. पण थोडा विचार करून 12,500 रुपयाचं कोटेशन देऊन मी बाहेर पडलो.  बाहेर पडल्यावर वाटलं की आपण जास्तच तर अमाउण्ट डिमांड तर नाही केली. मग दुसर्‍या दिवशी दादांचा कॉल आला आणि सांगितलं की कामाला लाग. तुमचं प्रपोजल फाइनल झालं आहे. अ‍ॅडवान्स पेमेंट घ्यायला ये. नंतर ते काम मी 15 दिवसांत पूर्ण केलं. त्यावेळी फोटो स्टुडियोमध्ये वाचलेलं उपयोगी पडलं.

मग नंतर आम्ही चोपडा येथे आलो तिथे मी डिप्लोमाला अ‍ॅडमिशन्स घेतली. दुसर्‍या वर्षापासून मी तिसर्‍या वर्षाचे प्रोजेक्ट्स घ्यायला सुरुवात केली. मी त्या तीन वर्षामध्ये बरीच प्रोजेक्ट्स आणि कस्टमर बेस बिल्ड केला. डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला मी हॅकिंगचा क्लासही चालू केला. मुलंही आले पण त्यात मी अपयशी ठरलो आणि 2 महिन्यातच तो बंद पडला. तिसर्‍या वर्षी मी डिप्लोमाला इअर ड्रॉप झालो. त्या काळात मला dreamatic innovation pvt. ltd. मध्ये  सीनिअर वेब डेव्हलपरची ऑफर आली. पॅकेजही चांगलं होत ( साडेपाच लाख/अ‍ॅनम).

डिप्लोमा इअर ड्रॉप मुलाला ही ऑफर मिळाली हे ऐकून सर्वच थक्क झाले. मी त्या कंपनीत काही महिने काम केलं. खूप गोष्टी शिकलो. नवीन लोक भेटले. मुंबईमध्ये आयुष्य कसं असत हे कळलं. तेव्हा माझं वय 20 वर्षे होतं. काही महिने काम केल्यावर मी तो जॉब सोडण्याचा विचार केला. उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परत आलो. एका कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला अ‍ॅडमिशन घेतली. मी आता तिसर्‍या वर्षाला आहे आणि मला आज सांगताना खूप आनंद होत आहे की मी आज UPPING GENPLUS PVT LTD. या कंपनीचा डायरेक्टर आहे. आज माझ्याकडे 128 पेक्षा जास्त क्लायंट्स आहेत. त्यात मी मुंबईच्या सॉफ्टवेअर आणि डिजिटल मार्केटिंग कंपनीमध्ये टेक्निकल अ‍ॅडवाइझर म्हणूनसुद्धा काम बघतो. माझ्या कंपनीमध्ये 5 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची टीम आहे. पुण्यात भांडारकर रोडला आमचं ऑफिस आहे. गेल्या एक वर्षापासून मी चोपडा, शिरपूर, अमळनेर  येथे  200 पेक्षा जास्त तरुणांना  सॉफ्टवेअर ट्रेनिंग देतोय. त्याची आई या कंपनीची संचालक आहे.

माझ्या आईवडिलांनी माझ्यावर भरवसा ठेवला, मला शिकू दिलं, धोका पत्करू दिला, प्रसंगी आर्थिक मदत केली. म्हणून मी इथवर पोहोचलो आहे. ही तर फक्त सुरुवात आहे.


Web Title: when 21 years college drop-out runs his own start up
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.