व्हॉट्सॲप विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नवा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 08:00 AM2021-01-14T08:00:00+5:302021-01-14T08:00:02+5:30

व्हॉट्सॲपचं प्रायव्हसी धोरण आणि ते आपण वापरणं, न वापरणं एवढ्यापुरतं हे सारं मर्यादित नाही, त्यापलीकडे त्याचा आपल्या वर्तनावर होणारा परिणाम पहायला हवा.

WhatsApp's new lesson of privacy | व्हॉट्सॲप विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नवा धडा

व्हॉट्सॲप विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नवा धडा

Next

-नेहा महाजन

when app is free you are the product !!

- या ओळीचा अर्थ आपल्या इतका कुठल्या पिढीला समजू शकेल असे मला वाटत नाही. अनेकविध ऑफर्सचा फायदा घेण्याच्या उत्साहात आपण घाईघाईत ‘accept’ आणि ‘agree’ ची बटणे दाबून पुढं जातो तेव्हा आपण स्वतःच स्वतःची माहिती समोरच्याला देत असतो हे आपल्या लक्षातदेखील येत नाही.

व्हॉट्सॲप हे ॲप आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं, त्यालाही आता काळ लोटला. आता मात्र त्या ॲपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरून खूप खल चालू आहे. मतमतांतरे आहेत.

अलीकडेच व्हॉट्सॲपचे नवे खासगीकरण धोरण जाहीर झाले आहे. त्याअंतर्गत ८ फेब्रुवारीपर्यंत यूजर्सनी सर्व अटी आणि नियम मान्य करून त्या स्वीकारत ॲप अपडेट करणं अपेक्षित आहे. आता अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, आपण हे ॲप वापरायचं की दुसरा काही पर्याय शोधायचा.

मुळात आपण या धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये जाणून घेऊया. नवीन धोरणाअंतर्गत व्हॉट्सॲपअंतर्गत केले जाणारे मेसेज आधीप्रमाणेच सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात कोणतीही माहिती फेसबुक अथवा अन्य ॲपबरोबर शेअर करण्यात येणार नाही. मात्र, आपला फोन नंबर, केले जाणारे व्हॉट्सॲप वापरून केले जाणारे आर्थिक व्यवहार, सेवासंबंधी माहिती, आपल्या मोबाईलची माहिती, आयपी ॲड्रेस ही सर्व माहिती फेसबुकला पुरवण्यात येणार आहे.

अशाप्रकारे फेसबुकला आपली माहिती देण्यात यावी की नाही हे निवडण्याचा अधिकार भारतातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही.

अर्थात नीट विचार केला तर असे दिसते की, ऑनलाईन पैसे भरणे, विविध मनोरंजन ओटीटी प्लॅटफॉर्म ऑनलाईन खरेदी यासाठी आपण आपली बँक खाती, त्याची माहिती या ना त्या मार्गाने वेबवर उपलब्ध करून दिलेली आहेच. तेव्हा केवळ एक व्हॉट्सॲप बंद करून आपली सर्व माहिती सुरक्षित राखली जाणार आहे का, याचा विचार करायला हवा. थोडक्यात काय तर, माहिती/विदा सुरक्षा या मुद्द्याचा अनेक पातळ्यांवर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

त्यातले हे काही ठळक मु्द्दे..

१. गेल्या दशकभरात व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया साइट्सचा वाढलेला प्रभाव जगाच्या कानाकोपऱ्यात अनुभवला गेला आहे. माहिती आणि त्याचा एका क्लिकवर होणारा प्रसार काय काय घडवू शकतो हे आपण जवळून पाहिले आहे. या सर्व घटना पाहिल्या की माहिती आणि त्याचा प्रचार याला इतके महत्व का दिले जात आहे हे देखील समजू लागते.

२. २०११ साली मध्य पूर्वेतील देशांत झालेल्या ‘जास्मीन क्रांती’ची ज्योत पेटवण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा होता. ट्विटरवर शेअर केल्या गेलेल्या post मुळे मध्य पूर्वेत राजवटी उलथल्या, लोकशाहीचे वारे वाहिले. २०११ नंतर ‘data is the new oil’ हे नव्याने जाणवले. त्यानंतर जगातील मोठ्या आणि लहान देशांतील निवडणुकीत या डेटाने महत्त्वाची भूमिका बजावली. सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे प्रचार आखले गेले, मतदारांचा कल तपासण्यात आला आणि निवडणुकांचे निकाल देखील ठरवण्यात आले. डेटा आणि त्याची ताकद हा मुद्दा केवळ राजकीय कारणांसाठी महत्त्वाचा ठरला असे नाहे, तर आज सोशल मीडिया समाजकारण, वैचारिक जडणघडण हे ठरवण्यात देखील मोलाची भूमिका पार पाडत आहे.

उदाहरण घ्यायचे झाले तर, असे म्हटले जाते की, इव्हेण्ट मॅनेजमेण्ट हे क्षेत्र उदारीकरण आणि भांडवली बाजार व्यवस्था याचे देणे आहे. विचार करा, आज लग्न कसे करावे, त्यात कोणते कपडे घालावे, फोटो कसे काढावे याचे मापदंड ठरवून देण्यात आलेले आहेत.

३. सोशल मीडिया या अशा कल्पनांना अधिक दृढ करण्याचे काम करते. विविध मार्गांनी एका ठराविक प्रकारे जगलेले आयुष्य म्हणजेच सुखी आयुष्य हे आपल्यावर ठसवण्यात येते. आपल्याला सतत फोमो (Fear of missing out) ची भीती वाटत राहते. या प्रवाहासोबत राहण्यासाठी आपण धडपडतो, वेळ प्रसंगी आर्थिकदृष्टया आपल्याला एखादी गोष्ट विकत घेणे शक्य आहे का नाही याचा विचार देखील करत नाही. आपले आयुष्य, त्यात केलेल्या निवडी आणि त्याचे प्रदर्शन हे सर्व सोशल मीडियाशी जोडलेले आहे.

४. अर्थात ही झाली सोशल मीडियाची एक बाजू. सोशल मीडियाला टाळून पुढे जाणे आपल्याला शक्य नाही हे देखील वास्तव आहे.

आज सोशल मीडियामुळे प्रत्येकाला त्याचा स्वतःचा असा एक आवाज मिळाला आहे. प्रत्येकाचे एक म्हणणे आहे जे मांडण्यासाठी त्यांना स्वतःच्या हक्काची जागा मिळाली आहे. अर्थार्जनापासून ते आनंदापर्यंत सोशल मीडिया आपल्या सर्व गरजा पूर्ण करू पाहत आहे. या सगळ्याचा आवाका इतका मोठा आहे की, त्यावर असे झटपट उत्तर मिळणे शक्य नाही, हे समजून याकडे पाहायला हवे.

५. आपण भान ठेवून आपल्या आयुष्याचे निर्णय घेतले तर आपण नक्कीच स्वतःला व्हॉट्सॲप विद्यापीठाचे विद्यार्थी बनण्यापासून रोखू शकतो, नाही का ?

(नेहा राज्यशास्त्राची अभ्यासक असून, परकीय भाषा क्षेत्रात कार्यरत आहे.)

neha9039@gmail.com

Web Title: WhatsApp's new lesson of privacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.