व्हॉटस्‌ॲप सेव्ह की डिलीट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 07:55 AM2021-01-14T07:55:55+5:302021-01-14T08:00:17+5:30

मुळात चॉइस आपला, आपण हे ॲप वापरणार की सोडून देणार?

WhatsApp- Save or delete ? | व्हॉटस्‌ॲप सेव्ह की डिलीट?

व्हॉटस्‌ॲप सेव्ह की डिलीट?

Next

-प्रसाद ताम्हनकर

सध्या चहाच्या टेबलापासून ते फेसबुकच्या भिंतीपर्यंत एकच चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे व्हॉटस्‌ॲपची नवी पॉलिसी. त्यावर एवढी चर्चा, एवढी मते; पण सरळ साधे उत्तर कुणी देईना की, व्हॉटस्‌ॲप वापरत राहायचे की बंद करायचे?

त्यावर सोपे उत्तर हेच की, तुम्हाला व्हॉटस्‌ॲप चालू ठेवायचे असेल, तर या पॉलिसीचा स्वीकार करण्यावाचून तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही! एकतर व्हॉटस्‌ॲप सांगतेय तसे ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बदललेल्या नव्या पॉलिसीचा स्वीकार करायचा, नाहीतर अकाउंट डिलीट करण्यात येईल.

सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते व्हॉटस्‌ॲपने हा एकतर्फी घेतलेला निर्णय अत्यंत अयोग्य आणि बेकायदेशीर आहे. येथे पॉलिसी नाकारण्याचा पर्यायच उपलब्ध नाही.

मात्र, त्यावर सध्या आपण काहीच करू शकत नाही. कारण सध्या आपल्या देशात इंटरनेटवर वैयक्तिक आणि खाजगी माहितीच्या सुरक्षेसंदर्भात कोणताही ठोस कायदा नाही. ‘पर्सनल डाटा प्रोटेक्शन ॲक्ट’ अजूनही प्रलंबित आहे आणि तो मंजूर होण्याआधीच व्हॉटस्‌ॲपसारख्या कंपन्या भारतीय युजर्सना अशी वागणूक देत आहेत.

जर आपण नीट बघितले, तर २०१४ साली फेसबुकने व्हॉटस्‌ॲपची खरेदी केली आणि साधारणपासूनच फेसबुकने व्हॉटस्‌ॲप वापरकर्त्यांचा डाटा फेसबुकशी शेअर करण्यास सुरुवात केली होती. अर्थात, आता यावेळी अगदी उघडपणे फेसबुकने हे मान्य केल्याने हा विषय चर्चेला आला आहे, असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही. सध्याच्या घडीला अशी हजारो ॲप्स आहेत, जी वापरकर्त्यांना कोणतीही कल्पना न देता, त्यांची वैयक्तिक माहिती साठवत असतात आणि थर्ड पार्टीबरोबर शेअरदेखील करत असतात.

आता व्हॉटस्‌ॲपने हे धोरणच उघड आणले आहे.

व्हॉटस्‌ॲप लवकरच भारतात ‘डिजिटल पेमेंट’ सेवा सुरू करते आहे आणि सर्वसामान्य वापरकर्त्यांना हीच चिंता सतावते आहे की, ही सेवा वापरल्यास त्यांच्या बँक खात्याची माहिती, त्यावरील व्यवहार अशी अत्यंत खाजगी आणि महत्त्वाची बातमीदेखील व्हॉटस्‌ॲप गोळा करणार आहे का आणि ती इतरांशी शेअरदेखील करणार का?

या क्षेत्रातील काही तज्ज्ञांच्या मतानुसार, व्हॉटस्‌ॲप भारतात डिजिटल पेमेंट सेवा सुरू करतानाच काही अटी घालण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार जर व्हॉटस्‌ॲपच्या भारत पेमेंट पॉलिसीमध्ये आणि व्हॉटस्‌ॲप प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काही अंतर समोर आले, तर भारतात फक्त आणि फक्त भारत पेमेंट पॉलिसीचेच नियम लागू असतील. त्यामुळे सध्यातरी व्हॉटस्‌ॲपवरून केल्या जाणाऱ्या व्यहारांविषयी भीती बाळगण्याचे कारण नाही. मुख्य म्हणजे व्हॉटस्‌ॲपचे मेसेजेस हे पूर्वीसारखेच ‘एंड टू एंड एन्क्रिप्टेड’ असणार आहेत. म्हणजेच मेसेज पाठवणारा आणि ज्याला तो मेसेज पाठवण्यात आला आहे, या दोघांशिवाय कोणीही तिसरा तो मेसेज वाचू शकणार नाही.

आता चॉइस आपला, आपण हे ॲप वापरायचे की सोडून द्यायचे!

(प्रसाद विज्ञान तंत्रज्ञानविषयक पत्रकार आहेत.)

prasad.tamhankar@gmail.com

Web Title: WhatsApp- Save or delete ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.