साधेपणानं लग्न केलेली कितीतरी जोडपी आपल्या अवतीभोवती असतात. नारायण आणि सुधा मूर्तीसारख्यांच्या साध्या लग्नाच्या आणि नंतरच्या अत्यंत साध्या लाईफस्टाईलच्या कहाण्या आपण वाचलेल्या असतात. पण नेमकी लग्न करायची वेळ येते तेव्हा कुठं जातं हे शहाणपण? साधेपणानं लग्न केलं अगदी ‘व्यवहार’ डोळ्यासमोर ठेवून जरी केलं तरी बरेच फायदे आहेत.
मात्र त्यासाठीच हे काही ‘जिव्हारी’ लागणारे प्रश्न.
1) एकतर जेवणावळी, डेकोरेशन, देणीघेणी यावरचा अवास्तव खर्च टळतो. त्यातून वाचलेला पैसा आपण आपल्यासाठी कुठं गुंतवू शकतो. विशेषत: मुलींच्या वडिलांनी तो पैसा मुलींच्या नावे फिक्स डिपॉङिाट करावा. (म्हणजे मुलीला द्यायचा असा हट्टच असेल स्वत:चा आणि मुलीचा तर.) अर्थात मुलींनी तरी का म्हणून सांगू नये की, मला नको हा पैसा नि खर्च. माझं लग्न साधेपणानंच करा.
2) लग्न ठरलं की विचारतो का आपण एकमेकांना की, पैशाचं प्लॅनिंग कसं करणार? कुठली बिलं कोण भरणार? आर्थिक जबाबदारी नक्की कुणाची?
3) ज्या मुलांना एरव्ही सगळ्यासंदर्भात स्वातंत्र्य हवं असतं त्यांनी आईवडिलांचा पैसा स्वत:च्या लग्नासाठी उडवणं, वापरणं किती बरोबर याचाही विचार करावा. आपण स्वकमाईचे पैसेसुद्धा अनाठायी उधळत नाही मग पालकांचे कष्टाचे पैसे असे का उडवावेत?
4) लाईफस्टाईलचा आपला आग्रह काय, महागडे गिफ्ट्स, प्रवास, हॉटेलिंग, दागिने हे हवंच असेल तर सांगतो का एकमेकांना की गृहीत धरतो लग्नाच्या नावाखाली?
5) साधेपणातून लग्न म्हणजे परस्पर विश्वास, सामंजस्य, आणि एकमेकांना साथ देत नव्या आयुष्याची सुरूवात असं आपण मानतो की लग्नातला तामझामच जास्त महत्त्वाचा वाटतो?