शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वस्ताद सुनीताताई

By admin | Updated: January 26, 2017 02:15 IST

सुनीता कडोळे. अकोल्यातील जवाहरनगर भागात भाजीपाल्याचं त्यांचं दुकान आहे. मात्र सुनीताताई यांची एवढीच ओळख नाही. त्या कुस्तीपटू आहेतच

 सुनीता कडोळे. अकोल्यातील जवाहरनगर भागात भाजीपाल्याचं त्यांचं दुकान आहे. मात्र सुनीताताई यांची एवढीच ओळख नाही. त्या कुस्तीपटू आहेतच, पण अनेकींना कुस्तीचे धडे देणाऱ्या ‘वस्ताद’ आहेत. सध्या चाळिशीत असलेल्या सुनीतातार्इंची अनेकरूपं आहेत. सकाळी त्या मैदानावर मुलींना कुस्तीचे धडे देतात. घरी आल्यानंतर गृहिणीच्या रूपात भराभर काम करतात. त्यानंतर जवाहरनगर चौकातील भाजीपाल्याच्या दुकानात त्यांचं काम चालतं अन् संध्याकाळी पुन्हा कुस्तीच्या मैदानावर त्या सराव करायला येतात. सुनीता यांचे माहेर मध्य प्रदेशातील इंदूरचे.

१९९१ मध्ये त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर पतीला असणारी कुस्तीची गोडी हळूहळू सुनीता यांनाही लागली. पतीच्या मार्गदर्शनात सुनीता यांचा कुस्ती शिकण्याचा प्रवास सुरू झाला. सुनीता यांचे पती मोरेश्वर यांना बालपणापासूनच कुस्तीचे प्रचंड वेड. घरची परिस्थिती जेमतेम असतानाही मोरेश्वर यांची कुस्ती प्रचंड बहरत होती. त्यातूनच मग त्यांनी विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या कुस्तीचा ठसा उमटवत ‘पहिलवान’ अशी ओळखही मिळवली.

कुस्तीबद्दल आपुलकी असणाऱ्या त्यांच्या पत्नीला त्यांनी कुस्ती शिकविण्याचा आणि कुस्ती खेळविण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या निर्णयाला घरातील आणि समाजातील अनेकांचा मोठा विरोध होता. मात्र समाजविरोधाची तमा न बाळगता मोरेश्वर यांनी आपल्या पत्नीला कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली. पुढे या दांपत्याला दोन मुले झाली. मात्र आपल्या पतीच्या समर्थ पाठिंब्यामुळे सुनीता यांना कुस्तीपटू व महाराष्ट्रातील पहिली महिला वस्ताद अशी ओळख मिळाली.

मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देता यावे म्हणून २००७ मध्ये सुनीता यांनी ‘मोरेश्वर महिला कुस्ती संस्था’ स्थापन केली. सध्या या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्याकडे अकोला आणि परिसरातील मुली कुस्तीचे धडे घेतात. यातील अनेक मुली आता विभाग, राज्य आणि देशपातळीवर कुस्तीमध्ये नाव कमवत पदकांची लयलूट करतात. २००७ मध्ये सुनीतातार्इंनी आपली मुलगी माधुरी हिला कुस्तीच्या आखाड्यात उतरवलं. आणि माधुरीनेसुद्धा २००७ मध्ये झालेल्या ‘विदर्भ केसरी’ स्पर्धेत रजतपदक जिंकत आपली छाप पाडली.

२००९ आणि २०१० मध्ये माधुरीने याच स्पर्धेत सलग दोन वर्षं सुवर्णपदक मिळवले. सध्या या दोघी माय-लेकी विविध गटांतील अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये सोबत सहभाग घेत असल्याने अनेकांना या माय-लेकीचे मोठे कौतुक वाटते. सुनीता यांच्या कुस्ती खेळण्याला आता २० वर्षे पूर्ण झालीत. घरची तुटपुंजी मिळकत अन् मुलींना कुस्ती शिकविण्याचं आभाळभर स्वप्न पाहणाऱ्या सुनीता यांना कुस्ती प्रशिक्षण देण्यासाठी जागा आणि साधनांची पडणारी कमतरता अस्वस्थ करते. 

शहरालगतच्या खेड्यातून कुस्ती शिकण्यासाठी मुलींना येण्यास अडचण होते म्हणून स्वखर्चाने या दांपत्याने कातखेडजवळ एक लहानसा भूखंड घेऊन तेथे आखाडा सुरू केला. या सर्व मुली मातीतच खेळतात. त्यांना मॅटच्या कुस्तीचा सराव नाही कारण कडाळे यांची मॅट घेण्याइतकी आर्थिक स्थिती नाही. सुनीताबाई सांगतात, ‘या मुलींना मजबूत आहार पाहिजे. पण या मुलींच्या घरी खाण्याचीच भ्रांत. त्यामुळे जे मिळेल ते खायचं अन् भरपूर काम करायचं.’ हे सांगताना सुनीताबार्इंचे डोळे पाणावतात. पण तरीही त्या अभिमानानं सांगतात की, शहरातील पोरी आमच्यासमोर टिकत नाहीत, अशी आमची तयारी आहे.

घरात कुस्तीचा ‘क’ जाऊ द्या पण खेळाच्या ‘ख’चीही चर्चा नाही. ‘म्हारी छोरिया छोरे से कम है के’ असं म्हणणारा कुणी ‘महावीर’ आणि कुणी आमीर खान माहिती असण्याचं काही कारण नाही. कारण सिनेमे पाहणं त्यांना परवडतही नाही. हातमजुरीवर पोट भरणाऱ्या आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या या मुली. सकाळी भागलं तर सांजच्या जेवणाची सोय होईल की नाही हा तिथं प्रश्न. पण तरीही त्यातल्याच काही लेकी गेल्या एक तपापासून अकोल्याच्या मातीत घाम ‘दंगल’ करत आहेत. दंगल चित्रपट प्रदर्शित झाला आणि देशभरात मुलींच्या कुस्तीची चर्चा सुरू झाली. परंतु अकोल्यात तब्बल एक तपापासून कुस्तीची लाल माती अंगावर घेत मुली मैदान गाजवत आहेत. इथल्या रहिवासी सुनीता मोरेश्वर कडोळे यांनी सर्वप्रथम अकोल्यात महिलांकरता कुस्तीची सुरुवात केली. श्री मोरेश्वर महिला कुस्ती प्रशिक्षण संस्था तिचं नाव. शेकडो मुली या आखाड्यात घाम गाळत आहेत. 

कोण या मुली?गरिबाघरच्याच. शेतमजुरी अन् एमआयडीसीमध्ये काम हेच त्यांच्या जगण्याचं साधन. मुलींनी शिकावं, मोठं व्हावं अशी स्वप्नं इथं परिवाराला परवडतच नाहीत. उलट मुलीने कामाला हातभार लावला तर तेवढेच चार पैसे मिळतील, ही भावना. पण या मुली जिद्दी. परिस्थितीपुढे हार पत्करायची नाही म्हणत त्या लाल मातीत उतरल्या आहेत. कुस्तीत आपलं भविष्य शोधत आहेत. ***जया वाकोडे. ती बारावीत शिकते. आई, वडील कामगार. सातव्या वर्गात असताना तिनं टीव्हीवर कुस्तीच्या लढती पाहिल्या. वाटलं, हे आपण केलं तर? हे काय नवीन आणलं डोक्यात म्हणून घरच्यांनी डोळे वटारले. पण मुलगी शिकतेय, तिला जास्त कळत असेल म्हणून ते गप्प बसले. कर तुला हवं ते म्हणाले. आजोबांचा विरोध होताच. पण सुनीताताई कुस्ती शिकवणार म्हटल्यावर त्यांनीही विरोध सोडून दिला. आज जया राज्यस्तरीय स्पर्धा गाजवते. जयासारखीच ज्योत्स्ना राजू टेकाम हिची परिस्थिती. टेकाम हे मूळचे आग्य्राचे. २५ वर्षांपूर्वी ते महाराष्ट्रात आले. कामाच्या शोधात कुंभारी गावात स्थायिक झाले. ज्योत्स्ना लहान असतानाच वडील गेले. आईनं मजुरी करून संसार सावरला. एक दिवस तिनं सुनीतातार्इंची कुस्ती पाहिली अन् मुलीला कुस्ती शिकवायची, हा ध्यास घेऊन ज्योत्स्नाला नवव्या वर्गातच सुनीतातार्इंच्या आखाड्यात टाकलं. आता ज्योत्स्ना मैदानं गाजवते आहे.

प्रगती भारसाकळे. येवता गावच्या शेतमजुराची मुलगी. आईला गायनाची आवड. गावात आईची गायिका म्हणून ओळख. पण प्रगतीला गायनापेक्षा पोलीस होण्याचा ध्यास. वयाच्या सहाव्या वर्षी ती कुस्तीच्या आखाड्यात उतरली. आता ती अकरावीत आहे. ७२ किलो वजनीगटात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते. इतकंच नव्हे, तर वेटलिफ्टिंगमध्येही तिनं नाव कमावलं आहे. मोनल सुरेश वानखडे, मयूरी दिलीप काळे, किरण खिराळे, अंजू डांगे, अपर्णा रंगारी या साऱ्याजणी याच आखाड्यात भेटतात. साऱ्यांची कथा सारखीच. हातावर पोट आणि मनात आग. डोक्यात जिद्द घेऊन कुस्ती खेळणाऱ्या या मुली.

नाहेदाबी जाफर अली. तिचं शिक्षण मराठी माध्यमात झालं. शाळेत इतर खेळ खेळताना तिला कुस्तीची माहिती मिळाली. कुस्ती खेळायची असा तिनं घरी हट्ट धरला; तेव्हा ती सातव्या वर्गात होती. घरची परिस्थिती बेताची. पण मुलीचा हट्ट पाहून घरच्यांनी तिला कुस्तीची परवानगी दिली. अन् सुनीतातार्इंच्या तालमीत नाहेदाबी तयार झाली. आता ती बी.ए.च्या दुसऱ्या वर्षाला आहे. मागील सात वर्षांपासून नाहेदाबी राज्यस्तर स्पर्धेत अकोल्याचे प्रतिनिधित्व करीत आहे.कल्याणी उपर्वट-चोरे ही पाच वर्षांपासून कुस्ती शिकते. लग्नानंतरही कल्याणीनं कुस्ती सोडली नाही, हे विशेष. 

अशा किती कहाण्या सांगाव्यात.मात्र या मुलींशी बोलताना कळतं की, या मुलींची दंगल, कुस्ती अजूनही त्यांच्या आईबाबांनी पाहिलेली नाही. कशी पाहणार? मजुरी पाडून कुस्ती पाहत कोण दिवस घालवेल? पण तरी निदान घरच्यांची साथसोबत आहे. पण समाजाच्या नजरा, हेटाळणी अन् हे काय भलतंच अशी टीका हे सारं काही चुकलेलं नाही. त्यात कोल्हापूरकडच्या कुस्तीच्या दंगलीत जेवढा मान आणि धन मिळतं त्या तुलनेत विदर्भात फार काही मिळत नाही. त्यामुळे फक्त या खेळावर पोट भरणार नाही याची जाणीव या मुलींना आहे. पण आता काहीजणींना वाटू लागलंय की, दिवस बदललेत तर खेळाच्या भरवशावर पोट भरण्याचं साधन म्हणून एखादी नोकरी तरी मिळेल. 

सुनीतातार्इंच्या या आखाड्यातून तब्बल २२ मुली पोलीस व इतर क्षेत्रात नोकरीला लागल्या आहेत. त्यामुळे बाकीच्यांनाही आपलं करिअर घडण्याची आस आहे. कठोर मेहनत, प्रचंड सराव आणि जिद्द यांच्या जोडीनं या मुली मैदान गाजवत आहेत.

कुस्तीच्या मैदानात प्रतिस्पर्ध्याला चितपट करणं सोपं आहे; पण आयुष्याची दंगल?ती जिंकणं कुठं एवढं सोपं आहे? एकेक डाव खेळत या मुली मात्र पुढे सरकत आहेत..जिंकतील त्या हे कुणी वेगळं सांगायला नको.. त्यांच्या डोळ्यातच दिसते ती जिंकण्याची आग.