पेपरची लाइन टाकणारा सीए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 07:15 AM2019-02-21T07:15:34+5:302019-02-21T07:20:01+5:30

पेपर टाकणारा पुण्याचा संदीप. घरची परिस्थिती जेमतेम. पण त्याच्या डोळ्यात स्वप्न होतं सीए व्हायचं. त्या खडतर प्रवासाची गोष्ट

The Story of How newspaper seller became a CA. | पेपरची लाइन टाकणारा सीए

पेपरची लाइन टाकणारा सीए

googlenewsNext

-- नेहा सराफ 

रोज धावणारी शहरं हजारो स्वप्नं घेऊन धावत असतात. प्रत्येकाची वेगळी पण लहान, मोठी, एका रात्रीत पूर्ण होणारी, कधीही पूर्ण न होणारी अशी स्वप्नं शहरभर भेटतात. 
तसंच एक स्वप्न घेऊन पुण्यात जगणारा संदीप भंडारी. लहानपणापासूनच परिस्थितीनं त्याला भल्या पहाटे उठवलं आणि  घरोघरी पेपर टाकायला लावलं; पण त्या भल्या पहाटेच्या कामातून त्यानं उघड्या डोळ्यांनी एक स्वप्न पाहिलं. सी.ए. होण्याचं! 
स्वप्नं पहायची तर जागावं लागतंच, झगडावं लागतं. ते त्यानंही केलं; मात्र हा प्रवास तितका सोपा नव्हता आणि सरळही. 

संदीप अवघ्या तिशीतला. वयाच्या दहाव्या वर्षापासून तो पेपर टाकायचं काम करतोय. ज्या वयात मुलांनी पेपर वाचावा असे संस्कार केले जातात, त्याच वयात घरच्या परिस्थितीमुळे तो पेपर टाकत आला आहे. वडील शिवणकाम करत, तर आई हॉस्पिटलमध्ये आया म्हणून काम करते. घर अगदीच दहा बाय दहा. अभ्यासाचं वातावरण तर लांबच पण साहित्यही नजरेस पडणं कठीण. महापालिकेच्या शाळेत दहावी पूर्ण केल्यावर परिस्थितीने गांजलेले वडील त्याला म्हणाले,  आता शिक्षण बास कर आणि कामधंदा शोध. त्यावर ताडदिशी तो म्हणाला,  नाही, मला शिकायचंय. माझा खर्च मी करेन पण शिकेनच. त्यानं आपला निश्चय लक्षात ठेवून कष्टही सुरू केले. 
 

गरवारे कॉलेजला अँडमिशन घेतली. सकाळी दीडशे घरात पेपर टाकून तो धावत पळत कॉलेजला जायचा. अकरावीच्या पहिल्याच दिवशी सरांनी कॉर्मसमध्ये                  असणा-या संधींविषयी/क्षेत्रांविषयी सांगितलं. त्यातही एमबीए, सीएस, सीए असे अनेक पर्याय त्यांनी सांगितले. मग त्यातल्या त्यात कमी पैशात होणा-या पण जास्त कष्ट कराव्या लागणा-या चार्टर्ड अकाउंट क्षेत्राची त्याने निवड केली. प्राथमिक पातळी असलेल्या सी.पी.टी. परीक्षेच्या क्लासची 16 हजार रुपये फी होती. अर्थात ती भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. दरम्यानच्या काळात केबल ऑपरेटरकडे बिल कलेक्शन करण्याचं कामही तो करू लागला. यात त्याला प्रति घर तीन रुपये मिळायचे. पै-पैचं महत्त्व जाणणा-या संदीपने ते कामही मनापासून केलं; पण तरीही हवे तेवढे पैसे जमत नव्हते. त्याने फॉर्म भरला आणि स्वत: केलेल्या अभ्यासावर परीक्षा दिली; पण दुर्दैवानं पदरी अपयश पडलं. इतके कष्ट करूनही साधा क्लासही लावता येत नाही. या काळात थेट आत्महत्येचा विचार त्याच्या मनात येत होता. त्याची ही अवस्था काही मित्रांनी ओळखली आणि मदत केली. त्याने  क्लास लावला आणि दुस-या प्रयत्नात पहिला टप्पा सुरू केला. पुढे त्याची आर्टिकलशिप सुरू झाली. त्याही काळात पहाटे पेपर टाकणं, दिवसभर ऑफिस, संध्याकाळी केबल बिल कलेक्शन आणि रात्री अभ्यास. दिवसातले चोवीस तासही त्याला कमी पडत होते. पण कष्टाची पर्वा न करता त्याने आय.पी.सी.सी. हा दुसरा टप्पा यशस्वीपणे पार केला. 
 

 आता ध्येय जवळ आलं होतं पण आर्थिक अडचणी वाढत होत्या. क्लास लावायला पैसे नव्हते, घरात वडिलांचं ऑपरेशन झालेलं, बहिणीचं शिक्षण अंतिम टप्प्यात होतं. यासार्‍यात संदीपने आपलं लक्ष्य ढळू दिलं नाही. त्याला एकानं कर्ज काढण्याचा सल्ला दिला. अखेर कर्ज मिळालं आणि तिस-या टप्प्याचे क्लास सुरू झाले. काम, क्लास आणि अभ्यास करताना दिवस पुरत नव्हता. पहाटे बाहेर पडणार तो रात्री उशिरा घरी परतायचा. त्या काळात लायब्ररीत अभ्यास करणारे मित्र जणू त्याचे अन्नदाते झाले. त्याने या काळात एक दोन नव्हे तर चार वेळा परीक्षा दिली पण अगदी एक-दोन मार्कांवरून यश हुलकावणी देत होतं. वय वाढत होतं आणि जबाबदा-याही. 

अखेर सी.ए. होण्याचा नाद सोडला. परत परीक्षा देणार नाही असा संकल्प केला आणि नोकरीला सुरुवात केली. मित्र  समजावत होते पण नैराश्य त्याची पाठ सोडत नव्हतं. पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी आली पण संदीपने फॉर्म भरायला नकार दिला; पण त्याच्या मित्रांनी त्याला न सांगताच फॉर्म भरला आणि अगदी परीक्षेच्या एक महिना आधी त्याला सांगितलं. पुन्हा परीक्षा, पुन्हा अभ्यास आणि अपयश आलं तर काय करावं कळत नव्हतं पण मित्नांच्या आग्रहाखातर त्याने नोकरी सोडली आणि अभ्यासाला लागला. यावेळी मात्र तो एक ग्रुप पास झाला. आता फक्त एका ग्रुपचा अडसर होता. त्यासाठी तीन वेळा प्रयत्न केला आणि अखेर त्याची नय्या पार झाली. 

संदीप भंडारीचा सीए संदीप भंडारी झाला. त्याची गोष्ट फक्त यशाची आणि अपयशाची नाही तर सलग सातत्याचीही आहे. न हरता जिद्दीनं चालत राहण्याचीही आहे.
म्हणून महत्त्वाची आहे.

-------------------------------------------

‘हा प्रवास खूप काही शिकवणारा होता. अजूनही विश्वास बसत नाही की मी सी.ए. झालोय; पण पेपरचं काम सोडणार नाही. या  लाइननं खूप काही दिलं. हे काम सोडणं अशक्य आहे. आता पहिल्यांदा नोकरी शोधणं, आईला आराम देणं, बहिणींची लग्नं, मोठं घर अशी अनेक स्वप्नं आहेत. म्हणतात ना स्वप्न कधीही पाठ सोडत नाहीत. आपणही त्यांना सोडू नये!’
- संदीप भंडारी

neha25saraf@gmail.com

Web Title: The Story of How newspaper seller became a CA.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.