- समीर मराठे
तलवारबाजी म्हणजे काय, ती कशी करतात, हा खेळ नेमका आहे तरी काय, याविषयी तिला काही म्हणजे काहीही माहीत नव्हतं. पण तरीही ती आज भारताची एक उत्कृष्ट तलवारबाज आहे आणि नुकताच तिला महराष्ट्र शासनाचा मानाचा श्री शिवछत्रपती पुरस्कार मिळालाय, असं सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही. पण ते वास्तव आहे.या तरुणीचं नाव रोशनी मुर्तडक. नाशिकची. सध्या टीवायबीएला आहे.सातवीत असताना, वयाच्या तेराव्या वर्षी सहज म्हणून तिनं ‘तलवार’ हातात घेतली आणि ही तलवार हेच आता तिचं आयुष्य झालं आहे. अर्थातच ही तलवार खेळण्यातली नव्हे, तर खेळातली!खऱ्या तलवारीइतकीच अस्सल. युद्ध या तलवारीनंही खेळलं जातं. तितक्याच जोशानं, पण स्पर्धेच्या मैदानात! ही तलवार हातात आली की ती खरोखरच रणरागिनी बनते, प्रतिस्पर्ध्यावर त्वेषानं तुटून पडते, पण तलवार खाली ठेवली, की समोरचा तोच प्रतिस्पर्धी तिची मैत्रीण असते!ही तलवार तिच्या हातात कशी आली, याचीही एक कहाणी आहे.तिच्या घरात खेळाचं वातावरण तसं सुरुवातीपासूनच होतं. वडील राजकारणी आणि राजकारणात असले, तरी ते एक चांगले खेळाडूही होते. कबड्डी आणि खो खो हे दोन्ही रांगडी आणि अस्सल देशी बाणाचे खेळ खेळण्यात त्यांचा हातखंडा होता. रोशनीची मोठी बहीण आणि भाऊदेखील हॅँडबॉलचे उत्कृष्ट खेळाडू.रोशनीला खेळात इंटरेस्ट होता, पण तिला वेगळं काही करायचं होतं. खेळातच करिअर करायचं की नाही, हेही ठरलेलं नव्हतं, पण काय करायचं नाही, हे मात्र तिचं पक्कं ठरलेलं होतं. आपली भावंडं, वडील जे खेळ खेळतात, ते खेळ तिला करिअर म्हणून खेळायचे नव्हते. त्यामुळे आपोआपच कबड्डी, खो खो, हॅँडबॉल हे खेळ बाद झाले..मग तिच्या हातात तलवार आली कशी?..त्यावेळी ती सातवीत होती. वय वर्षे तेरा. शाळेत असताना बरेच खेळ खेळत असली तरी करिअर म्हणून कुठल्याच खेळाकडे ती वळलेली नव्हती. तशातच तिच्या क्रीडा शिक्षिका निर्मला चौधरी यांनी तिला तलवारबाजी या खेळाची ओळख करून दिली. सहज म्हणून ती तो खेळ खेळायला लागली आणि मग हा खेळ तिच्या नसानसांतच भिनला. थोड्याच कालावधीत तिनं त्यात प्रगती केली. वेगवेगळ्या स्पर्धा खेळायला लागली. बक्षीसंही येत गेली. त्यानंतर मग तिनं पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही.श्री शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर रोशनीशी संपर्क साधला. तिचं म्हणणं होतं, सुदैवानं माझं घर बऱ्यापैकी पुरोगामी विचारांचं असल्यानं इतर मुलींना जो संघर्ष येतो, तो माझ्या वाट्याला आला नाही. आर्थिक परिस्थितीशीही मला कधी झगडावं लागलं नाही. पण प्रत्येक खेळाडूचा म्हणून एक संघर्ष असतो, लढाई असते, ती प्रत्येकाला लढावीच लागते. तशीच ती मलाही लढावी लागली. कोणाचीच त्यातून सुटका होऊ शकत नाही.रोशनीच्या आयुष्यातील एक घटना तिच्या मनावर कोरली गेली आहे. स्कूल नॅशनल्ससाठी रोशनीचं सिलेक्शन झालेलं होतं. महत्त्वाची स्पर्धा असल्यानं त्यासाठीची तयारीही जोरात सुरू होती, पण त्याच काळात तिचा अपघात झाला. गुडघ्याला दुखापत झाली. जखमही मोठी होती. हालचालींवर मर्यादा आल्या. कुठलाही खेळ म्हटला की, त्यात मोठ्या प्रमाणात शारीरिक हालचाली कराव्या लागतात. तलवारबाजीही त्याला अपवाद नाही.या स्पर्धेच्या शिबिरासाठी राष्ट्रीय शिबिरात तिची निवड झालेली होती. आंध्र प्रदेशात स्पर्धा होणार होती. अपघातामुळे स्पर्धेतील कामगिरीविषयी तिच्यासह साऱ्यांनीच आशा सोडलेली होती.स्पर्धा सुरू होईपर्यंतही दुखापत पूर्णपणे ठीक झालेली नव्हती. पण प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाल्यावर तिच्यात खरोखरच रणरागिणी संचारली. हालचालींवरच्या मर्यादा, आपल्या सगळ्या वेदना रोशनी विसरली. तलवार हाती येताच त्वेषानं ती प्रतिस्पर्ध्यावर तुटून पडली. एकेक मॅच जिंकत गेली आणि या स्पर्धेत तिनं चक्क गोल्ड मेडल मिळवलं!रोशनी म्हणते, आपला स्वत:वर भरोसा असला, की काय घडू शकतं, याचा हा अनुभव माझ्यासाठीही विलक्षण होता!अर्थातच सगळ्याच गोेष्टी तिच्यासाठी सोप्या होत्या, असं नाही. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात बॅड पॅच येतो.. ट्रेनिंग सुरू असतं, मैदानावर आणि मैदानाबाहेरही घाम गाळला जात असतो, पण कामगिरी मनासारखी होत नाही. अशा वेळी तो खेळाडू मनानं खचतो आणि मैदानातली त्याची कामगिरी आणखीच खालावत जाते. असे काही बॅड पॅच रोशनीच्याही आयुष्यात आले.या प्रत्येक टप्प्यावर घरच्यांचा पाठिंबा होताच, पण मैदानावरची कामगिरी तर आपल्याला प्रत्यक्षच करावी लागते. मैदानावर तर घरचे नसतात. तिथे कोच, बरोबरचे सहकारी, मित्र-मैत्रिणी यांचीच सोबत महत्त्वाची ठरते. ती तिला वेळोवेळी मिळाली.रोशनी सांगते, माझ्या या अडचणीच्या काळात, बॅड पॅचमध्ये मला सर्वाधिक मदत झाली ती माझ्या मैत्रिणीची. अमृता वीरची. ती माझ्यासारखीच तलवारबाजीची खेळाडू आहे. उत्कृष्ट प्लेअर आहे. नॅशनल खेळाडू आहे, पण त्याआधी ती माझी सख्खी मैत्रीण आहे. ज्या ज्या वेळी मी बॅड पॅचमधून जात होते, त्या त्या वेळी ती माझ्या पाठीमागे एखाद्या भिंतीसारखी उभी राहिली, तिनं मला नुसता पाठिंबाच दिला नाही, तर मला आधार दिला, प्रोत्साहन दिलं, या मानसिक स्थितीतून बाहेर येण्यासाठी मोठं बळ दिलं.